नवी दिल्ली: गेल्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या 44 जागांवर घसरलेल्या काँग्रेसची कामगिरी यंदादेखील फारशी चांगली झालेली नाही. सध्या काँग्रेसला 50 च्या आसपास जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपा आणि मित्रपक्षांनी तब्बल साडेतीनशे जागांवर आघाडी घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसमुक्त भारत अशी घोषणा दिली होती. ही घोषणा जवळपास 14 राज्यांमध्ये खरी ठरताना दिसते आहे. या राज्यांमध्ये काँग्रेसला भोपळादेखील फोडता येणार नाही, अशी परिस्थिती आहे. जम्मू काश्मीर- राज्यातील एकूण 6 जागांपैकी 3 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर उर्वरित तीन जागांवर नॅशनल कॉन्फरन्स पुढे आहे. राज्यात काँग्रेस आणि पीडीपीला एकाही मतदारसंघात यश मिळताना दिसत नाही. आंध्र प्रदेश- दक्षिण भारतातलं प्रमुख असलेल्या आंध्र प्रदेशात लोकसभेच्या एकूण 25 जागा आहेत. यापैकी 24 जागांवर वायएसआर काँग्रेस, तर एका जागेवर टीडीपी पुढे आहे. अरुणाचल प्रदेश- चीनच्या सीमेला लागून असलेल्या या राज्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. या दोन्ही जागांवर भाजपा विजयासमीप आहे. गुजरात- पंतप्रधान मोदींच्या होमग्राऊंडमध्ये भाजपानं निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे. राज्यातील 26 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. 2014 मधील विजयाची भाजपानं पुनरावृत्ती केली. हरियाणा- राज्यातील सर्वच्या सर्व 10 जागांवर भाजपानं विजय मिळवला आहे. हिमाचल प्रदेश- राज्यातील चारही जागांवर भाजपानं कब्जा केला आहे. गेल्या निवडणुकीतही भाजपानं या राज्यात सर्व जागा मिळवल्या होत्या. उत्तराखंड- उत्तर भारतातलं डोंगराळ राज्य असलेल्या उत्तराखंडमधील पाचही जागांवर भाजपाचे उमेदवार पुढे आहेत. मणीपूर- राज्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत. यातील एका जागेवर भाजपा, तर एका जागेवर नागा पीपल्स फ्रंट आघाडीवर आहे. मिझोराम- राज्यातील एकमेव लोकसभा मतदारसंघात मिझो नॅशनल फ्रंट पुढे आहे. ओडिशा- राज्यातील एकूण 21 जागांपैकी 14 जागांवर सत्ताधारी बिजू जनता दल, तर 7 जागांवर भाजपा आघाडीवर आहे. राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला एकाही जागेवर यश मिळालेलं नाही. दिल्ली- राजधानी दिल्लीत काँग्रेस आणि आप आघाडी करणार अशी चर्चा होती. मात्र या दोन्ही पक्षांनी स्वतंत्र लढवली. त्याचा मोठा फटका दोन्ही पक्षांना बसला आहे. भाजपा दिल्लीतील सातही मतदारसंघात पुढे आहे. राजस्थान- राज्यातील सर्वच्या सर्व 25 मतदारसंघात काँग्रेसची धूळधाण होताना दिसत आहे. 24 मतदारसंघात भाजपा, तर एका मतदारसंघात मित्रपक्ष राष्ट्रीय लोकतांत्रिक पार्टी आघाडीवर आहे. सिक्कीम- ईशान्य भारतातील सिक्कीममधील एकमेव मतदारसंघात सिक्किम क्रांतिकारी मोर्चा आघाडीवर आहे. त्रिपुरा- राज्यातील दोन्ही मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहेत.
Lok Sabha Election 2019: 14 राज्यं काँग्रेसमुक्त; बघा कुठे कुठे मिळाला काँग्रेसला भोपळा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 4:55 PM