नवी दिल्लीः देशभरात मोदी लाट नसल्याची विरोधकांकडून आवई उठवली जात होती. परंतु एका सुप्त लाटेनं विरोधकांचा सुपडा साफ होत असल्याचं चित्र समोर आलं आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला 345 जागा मिळण्याचा कल हाती आला असून, काँग्रेसला शतक गाठणंही कठीण असल्याचं दिसत आहे. या विजयावर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींही प्रतिक्रिया दिली आहे. सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत, असं मोदी ट्विट करत म्हणाले आहेत. एकत्र विकास करू, एकत्र उन्नती करू, एक मजबूत आणि सर्वसमावेशक भारत तयार करू, अशी आशाही मोदींनी व्यक्त केली आहे. पुलवामा हल्ल्यानंतर बालकोटमध्ये भारतीय हवाई दलाने घुसून एअर स्ट्राईक केलं. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेला हा निर्णय लोकांच्या पसंतीस पडल्याचं आता स्पष्ट झालं आहे. त्यात मोदींनी आणि भाजपाने या एअर स्ट्राईकचा पुरेपूर वापर निवडणुकीच्या प्रचारात करून घेतला होता. देशभक्ती, दहशतवाद हे मुद्दे प्रामुख्याने निवडणुकीच्या प्रचाराचा केंद्रबिंदू बनले होते. त्याचा फायदा भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला झाल्याचं समोर आलं आहे. देशभक्तीचा मुद्दा हा भाजपाच्या विजयाचं प्रमुख कारण असल्याचीही चर्चा आहे.मोदी यांच्याशिवाय पंतप्रधानपद यशस्वीरीत्या सांभाळेल असा कोणताही नेता विरोधी पक्षात नसल्याचा मुद्दा भाजपाकडून सातत्यानं मांडला जात होता. त्याचा फायदा भाजपाला झााल्याचं चित्र आहे. मोदींना पर्याय कोण असा प्रचार भाजपा कार्यकर्त्यांकडून केला गेला होता. पंतप्रधानपदासाठी राहुल गांधी यांना पुढे करावं यासाठी विरोधी पक्षांमध्ये एकमत नव्हतं. त्यामुळे There is no alternative या फॅक्टरमुळे विरोधकांना मोठं नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. तसेच मोदींना पुन्हा एकदा संधी द्यावी असंही लोकांच्या मनात होतं त्याचा मोठा फायदा भाजपाला झाला.
लोकसभा निवडणूक निकाल 2019: सबका साथ, सबका विकास, मोदींनी व्यक्त केला विजयी भारतावर विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 3:36 PM