६८ वर्षांत एप्रिल-मे महिन्यात लोकसभेची पाचवी निवडणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 05:09 AM2019-03-11T05:09:36+5:302019-03-11T07:01:23+5:30
२००४ पासून एप्रिल महिन्यालाच पसंती; आयोगाची अवघड परीक्षा
- धनंजय वाखारे
नाशिक : लोकसभेसाठी ६८ वर्षांत एप्रिल महिन्यात होणारी ही पाचवी निवडणूक आहे. २००४ पासून भारतीय निवडणूक आयोगाकडून एप्रिल आणि मे महिन्यातच निवडणुका घेतल्या जात आहेत.
पहिली लोकसभा निवडणूक तीन टप्प्यात घेण्यात आली होती. ऑक्टोबर १९५१, डिसेंबर १९५१ आणि फेब्रुवारी १९५२ मध्ये निवडणूक प्रक्रिया पार पडली. त्यानंतर १९५७ च्या निवडणुकीपासून निवडणूक आयोगाचा गाडा सुरळीत झाला. १९५७ मध्ये २४ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यात आली. १९६२ मध्ये १९ ते २५ फेबु्रवारी, १९६७ मध्ये १७ ते २१ फेबु्रवारी, १९७१ मध्ये १ ते १० मार्च, १९७७ मध्ये १६ ते २० मार्च, १९८० मध्ये जनता पक्षाचे सरकार कोसळल्यानंतर ३ ते ६ जानेवारी तर पुढे चार वर्षांतच १९८४ मध्ये २४ ते २८ डिसेंबर या कालावधीत निवडणूक झाली होती.
१९८९ मध्ये २२ ते २६ नोव्हेंबर, १९९१ मध्ये २० मे ते १५ जून तर नरसिंहराव सरकारने पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर १९९६ मध्ये २७ एप्रिल आणि २ ते ३० मे अशा कालावधीत निवडणुका झाल्या. दोन वर्षातच सरकार कोसळल्यानंतर १९९८ मध्ये १६ ते २३ फेब्रुवारी दरम्यान निवडणूक झाली. पुढे एका वर्षातच १९९९ मध्ये ५, ११, १८, २५ सप्टेंबर आणि ३ ते ६ ऑक्टोबर या अशा विविध टप्प्यात निवडणूक प्रक्रिया पार पाडली. १९९९ नंतर सरकार पूर्ण पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करण्यात यशस्वी होत गेले. त्यामुळे २००४ मध्ये २० एप्रिल ते १० मे, २००९ मध्ये १६ एप्रिल ते १३ मे कालावधीत निवडणूक झाली. २०१४ मध्ये ७ एप्रिल ते १२ मे असा महिनाभराचा कालावधी होता.
चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया
१९८० मध्ये चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया राबविण्याचा विक्रम भारतीय निवडणूक आयोगाने केला होता. ३ ते ६ जानेवारी या अवघ्या चार दिवसांत निवडणूक प्रक्रिया राबविली गेली. त्यानंतर, १९६७, १९७७, १९८४ आणि १९८९ या वर्षी पाच दिवसांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण केल्याची नोंद आहे. १९९१ च्या निवडणुकीपासून मात्र वेगवेगळ्या टप्प्यांत दीर्घ कालावधीत निवडणूक प्रक्रिया राबविण्यास सुरूवात झालेली आहे.
कोणत्या राज्यात कोणकोणत्या टप्प्यात होणार मतदान
पहिला टप्पा : ११ एप्रिल : ९१ जागा - आंध्र प्रदेश २५ जागा, अरुणाचल २ जागा, आसम ५ जागा, बिहार ४ जागा, छत्तीसगढ १ जागा, जम्मू-काश्मीर २ जाग), महाराष्ट्र ७ जागा, मेघालय १ जागा, मिजोरम १ जागा, ओडिशा ४ जागा, सिक्किम १ जागा, तेलंगाना १७ जागा, त्रिपुरा १ जागा, उत्तर प्रदेश ८ जागा, उत्तराखंड ५ जागा, पश्चिम बंगाल २ जागा, अंदमान निकोबार १ जागा, लक्षद्वीप १ जागा.
दुसरा टप्पा : १८ एप्रिल : ९१ जागा - आसम ५, बिहार ५, छत्तीसगढ ५, जम्मू-काश्मीर-२, कर्नाटक १४, महाराष्ट्र १०, मणिपूर १, ओडिशा ५, तमिळनाडू ३९, त्रिपुरा १, उत्तर प्रदेश ८, पश्चिम बंगाल ३, पुद्दुचेरी १.
तिसरा टप्पा : २३ एप्रिल : ११५ जागा - आसम ४, बिहार ५, छत्तीसगढ ७, गुजरात २६, गोवा २, जम्मू-काश्मीर १, कर्नाटक १४, केरळ २०, महाराष्ट्र १४, ओडिशा ६, उत्तर प्रदेश १०, प. बंगाल ५, दादर नागर हवेली १, दमन दीव १.
चौथा टप्पा : २९ एप्रिल : ७१ जागा - बिहार ५, जम्मू-काश्मीर १, झारखंड ३, मध्यप्रदेश ६, महाराष्ट्र १७, ओडिशा ६, राजस्थान १३, उत्तर प्रदेश १३, पश्चिम बंगाल ८
पाचवा टप्पा : ६ मे : ५१ जागा - बिहार ५, जम्मू काश्मीर २, झारखंड ४, मध्यप्रदेश ७, राजस्थान १२, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ७
सहावा टप्पा : १२ मे : ५९ जागा - बिहार ८, हरियाणा १०, झारखंड ४, मध्यप्रदेश ८, उत्तर प्रदेश १४, पश्चिम बंगाल ८, दिल्ली ७
सातवा टप्पा : १९ मे : ५९ जागा - बिहार ८, झारखंड ३, मध्यप्रदेश ८, पंजाब १३, चंडीगढ़ १, पश्चिम बंगाल ९, हिमाचल ४
आजपर्यंतच्या सर्व लोकसभा
निवडणुकांच्या तारखा सरकार कोणाचे पंतप्रधान
१) १९५१-५२ - ऑक्टोबर १९५१, - काँग्रेस - पं.जवाहरलाल नेहरू
डिसेंबर १९५१, फेब्रुवारी १९५२.
२) १९५७ - २४ फेब्रुवारी ते १४ मार्च- काँग्रेस- पं.जवाहरलाल नेहरू
३) १९६२ - १९ ते २५ फेब्रुवारी- काँग्रेस- पं.जवाहरलाल नेहरू
४) १९६७ - १७ ते २१ फेब्रुवारी- काँग्रेस- इंदिरा गांधी
५) १९७१ - १ ते १० मार्च- काँग्रेस- इंदिरा गांधी
६) १९७७ - १६ ते २० मार्च- जनता- पक्ष मोरारजी देसाई
७) १९८० - ३ ते ६ जानेवारी- काँग्रेस- इंदिरा गांधी
८) १९८४ - २४ ते २८ डिसेंबर- काँग्रेस- राजीव गांधी
९) १९८९ - २२ ते २६ नोव्हेंबर- जनता दल- व्ही.पी.सिंग
१०) १९९१ - २० मे ते १५ जून- काँग्रेस- नरसिंह राव
११) १९९६ - २७ एप्रिल ते ३० मे - भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी
१२) १९९८ - १६ ते २३ फेब्रुवारी- भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी
१३) १९९९ - ५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर- भाजपाप्रणित एनडीए- अटलबिहारी वाजपेयी
१४) २००४ - २० एप्रिल ते १० मे- काँग्रेसप्रणित युपीए- डॉ.मनमोहनसिंग
१५) २००९ - १६ एप्रिल ते १३ मे- काँग्रेसप्रणित युपीए- डॉ.मनमोहनसिंग
१६) २०१४ - ७ एप्रिल ते १२ मे- भाजपाप्रणित एनडीए- नरेंद्र मोदी
१७) २०१९ - ११ एप्रिल ते १९ मे ? ?
(टीप : पं.जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर आधी गुलजारीलाल नंदा हे काळजीवाहू पंतप्रधान झाले. त्यानंतर लालबहादूर शास्री पंतप्रधान झाले.शास्रींच्या निधनानंतर पुन्हा गुलजारीलाल नंदा काळजीवाहू पंतप्रधान झाले. इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी पंतप्रधान झाले. मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वातील जनता सरकार कोसळल्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर चौधरी चरणसिंह पंतप्रधान झाले. १९९१ मध्ये व्ही.पी.सिंग सरकार कोसळले आणि काँग्रेसच्या पाठिंब्याने चंद्रशेखर पंतप्रधान झाले. १९९६ मध्ये वाजपेयी सरकार तेराच दिवस टिकले आणि आधी एच.डी.देवेगौडा आणि नंतर इंद्रकुमार गुजराल काँग्रेसच्या बाहेरून पाठिंब्याने पंतप्रधान झाले पण त्यांचे सरकारही अल्पजीवी ठरले.)