काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 06:32 PM2024-06-06T18:32:06+5:302024-06-06T18:33:08+5:30
loksabha Election Result - महाराष्ट्रात काँग्रेसनं सर्वाधिक १३ जागा जिंकल्या असून आता त्यात आणखी एका खासदाराची भर पडली आहे.
नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वात जास्त लक्ष वेधून घेतलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील १ लाखांच्या मताधिक्यांनी जिंकून आले. याठिकाणी मविआकडून उद्धव ठाकरेंनी उमेदवार दिला होता. मात्र ठाकरेंची मशाल पाडून विशाल पाटील खासदार झाले. आता त्याच विशाल पाटलांनी विश्वजित कदमांसोबत दिल्लीत जात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे पाठिंबा पत्र दिलं आहे.
मल्लिकार्जुन खरगे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रात अहंकारी राजकारणाला जनतेने पराभूत केले.सामाजिक न्याय, समता आणि स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या आपल्या प्रेरणादायी दिग्गजांना ही योग्य श्रद्धांजली आहे. सांगलीतील खासदार विशाल पाटील यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याचं त्यांनी सांगितले. विशाल पाटलांच्या या पाठिंब्यामुळे देशात काँग्रेस खासदारांनी शतक गाठल्याचं दिसून येते.
People of Maharashtra defeated the politics of treachery, arrogance and division.
— Mallikarjun Kharge (@kharge) June 6, 2024
It is a fitting tribute to our inspiring stalwarts like Chhatrapati Shivaji Maharaj, Mahatma Jyotiba Phule and Babasaheb Dr Ambedkar who fought for social justice, equality and freedom.… pic.twitter.com/lOn3uYZIFk
ठाकरेंनी व्यक्त केली होती नाराजी
सांगली लोकसभा मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती. मात्र त्याठिकाणी काँग्रेस नेते विशाल पाटील इच्छुक होते. मात्र काँग्रेसचा विरोध डावलून ठाकरेंनी चंद्रहार पाटलांची उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे विशाल पाटलांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. याबाबत ठाकरे गटाकडून विशाल पाटलांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. विशाल पाटलांना त्यांच्या नेत्यांनी समजवावं असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. मात्र ठाकरे गटाचा विरोध डावलून सांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचा प्रचार केला. त्यामुळे या निवडणुकीत विशाल पाटील विजयी झाले.
दरम्यान, सांगली लोकसभा मतदारसंघाचे भाजपा उमेदवार संजय पाटील यांनी २०१४ आणि २०१९ असे दोनवेळा मतदारसंघाचे नेतृत्व केले. २०२४ च्या निवडणुकीत त्यांची हॅट्ट्रिक होणार होती, पण पक्षातंर्गतच विरोध झाल्यामुळे त्यांची हॅट्ट्रिक हुकली आहे. केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात जनतेतून मोठ्या प्रमाणात उठाव झाला. मराठा, धनगर, ओबीसी आरक्षणाचाही मुद्दा निवडणुकीत चांगलाच गाजला. हे सर्व प्रश्न विशाल पाटील यांच्या पथ्यावर पडले. जत विधानसभा मतदारसंघ वगळता सांगली, मिरज, खानापूर, पलूस-कडेगाव, तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात विशाल पाटील यांना चांगले मताधिक्य मिळाले.