नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये उत्साहाचे वातावरण आहे. विजय निश्चित झाल्यानंतर भाजपाच्या दिल्लीतील मुख्यालयात जल्लोषास सुरुवात झाली असून, भाजपाध्यक्षअमित शहा यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले आहे. हा विजय ऐतिहासिक आहे, तब्बल 50 वर्षांनंतर कुठल्याही नेत्याने दुसऱ्यांदा स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता मिळवली आहे, असे अमित शहा यांनी म्हटले आहे. यावेळी अमित शहा यांनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीचे कौतुक करतानाच विरोधकांना टोला लगावला. काँग्रेसच्या खालावलेल्या कामगिरीचा उल्लेख करताना 17 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात काँग्रेसला खातेही उघडता आले नसल्याचा टोला लगावला. तसेच अमित शहा यांनी पक्षाला पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या यशाचाही आवर्जुन उल्लेख केला. ''बंगालमध्ये हिंसाचार आणि हेराफेरीच्या घटना घडल्यानंतरही भारतीय जनता पक्षाला 18 जागा मिळवण्यात यश मिळाले आहे. आगामी काळात भाजपा पश्चिम बंगालमध्ये प्रस्थापित होण्याचे हे संकेत आहेत."असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी सत्तास्थापनेसाठी धावाधाव करणाऱ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनाही मोदींनी टोला लगावला. चंद्राबाबू नायडू यांनी गाठीभेटी घेण्यापेक्षा थोडी मेहनत घेतली असती तर काही जागा निवडून आल्या असत्या, असा चिमटाही अमित शहांनी काढला.