वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 05:00 PM2024-06-06T17:00:07+5:302024-06-06T17:05:41+5:30

loksabha Election Result - लोकसभा निवडणूक निकालात यंदा अनेक दिग्गज मंत्री, नेत्यांना लोकांनी घरी बसवलं. तर असेही काही युवा चेहरे पहिल्यांदा संसदेत पोहचणार आहेत.

Lok Sabha Election Results - Priya Saroj, Shambavi Chaudhary, Sanjana Jatav became Lok Sabha MPs at the age of 25 | वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?

वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालातून देशात एनडीए सरकार बनवण्यासाठी बहुमत मिळालं आहे. मात्र मागील निवडणुकीपेक्षा यंदा तुलनेने सत्ताधारी पक्षांचं संख्याबळ घटलं आहे. परंतु सरकार बनवण्यासाठी पुरेसे बहुमत त्यांच्याकडे आहे. यंदाच्या निवडणूक निकालाने अनेक दिग्गजांना धक्के दिले त्याचसोबत असेही काही चेहरे आहेत ज्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून थेट संसद गाठली. 

वयाच्या २५ वर्षी खासदार बनलेल्या या उमेदवारांची बरीच चर्चा आहे. त्यात राजस्थानच्या भरतपूर येथून निवडून आलेल्या संजना जाटव यांचा समावेश आहे. त्याशिवाय बिहारच्या समस्तीपूर लोकसभा मतदारसंघात लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवार शांभावी चौधरी यांनीही निवडणुकीत विजय मिळवला आहे. या दोन्ही उमेदवारांचे वय २५ वर्ष आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या कौशांबी येथून २५ वर्षीय पुष्पेंद्र सरोज यांचाही समावेश आहे.

संजना जाटव

काँग्रेसनं राजस्थानच्या भरतपूर लोकसभा जागेवर संजना जाटव यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी ही निवडणूक जिंकली असून सर्वात कमी वयाच्या खासदार बनल्या आहेत. संजना जाटव यांनी भाजपाचे उमेदवार रामस्वरुप कोली यांना ५१ हजार मताधिक्याने पराभूत केले आहे. २५ वर्षीय संजना जाटव या दलित समुदायातून येतात. १८ व्या लोकसभेत निवडलेल्या त्या सर्वात कमी वयाच्या खासदार आहेत. २०१९ मध्ये महाराजा सूरजमल बृज यूनिवर्सिटीतून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतले. 

शांभावी चौधरी

बिहारच्या समस्तीपूर येथून एलजेपीच्या उमेदवार शांभावी चौधरी यांनी विजयाचा झेंडा फडकावला आहे. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार सन्नी हजारी यांना मोठ्या फरकाने पराभूत केले आहे. त्यादेखील देशातील सर्वात कमी वयाच्या खासदार बनल्या आहेत. शांभावी यांना १ लाख ८७ हजार २५१ मताधिक्याने विजय मिळाला आहे. त्यांना एकूण ५ लाख ७९ हजार ७८६ मते मिळाली आहेत. 

पुष्पेंद्र सरोज 

उत्तर प्रदेशच्या कौशांबी लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार पुष्पेंद्र सरोज यांनी जबरदस्त विजय मिळवला आहे. त्यांचे वयही २५ वर्ष आहे. त्यांनी भाजपाचे दोनदा खासदार राहिलेले विनोद सोनकर यांना १ लाख ३ हजार मताधिक्याने हरवले आहे. पुष्पेंद्र सरोज यांना एकूण ५ लाख ९ हजार ७८७ मते मिळाली तर भाजपाच्या विनोद सोनकर यांना ४ लाख ५ हजार ८४३ मते मिळालीत. 

प्रिया सरोज 

उत्तर प्रदेशच्या मछलीशहर लोकसभा मतदारसंघात प्रिया सरोज यांनी समाजवादी पक्षाकडून विजय मिळवला आहे. त्यांनी बीपी सरोज यांचा ३५ हजार मतांनी पराभव केला आहे. प्रिया सरोज यांना ४ लाख ५१ हजार २९२ मते मिळाली. प्रिया सरोज यांचेही वय २५ वर्ष आहे. 
 

Web Title: Lok Sabha Election Results - Priya Saroj, Shambavi Chaudhary, Sanjana Jatav became Lok Sabha MPs at the age of 25

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.