पटणा - लोकसभा निवडणुकीच्या निकालानं भाजपाच्या पदरी निराशा आली आहे पण बिहारमध्ये भाजपा घटक पक्षाला फायदा होताना दिसत आहे. निवडणुकीत सत्ताधारी एनडीए आणि इंडिया आघाडीत काटे की टक्कर पाहायला मिळाली. हिंदू, मुस्लीम, पाकिस्तान, आरक्षण, संविधान, मंदिर आणि मंगळसूत्र हे शब्द निवडणूक प्रचारात नेत्यांकडून वापरण्यात आले. या निवडणुकीत सर्वाधिक रोड शो, सभा आणि रॅली पंतप्रधान मोदींनी केले होते.
एनडीएच्या नेत्यांनी मोदींचा चेहरा पुढे करत सरकारच्या कामांचा उल्लेख केला होता. तर विरोधी पक्षातील नेत्यांनी महागाई, बेरोजगारी आणि संविधान वाचवण्याची लढाई यावर फोकस केला होता. या निवडणुकीत उत्तर प्रदेश आणि बिहार अशी २ राज्ये आहेत. ज्यांच्या माध्यमातून दिल्लीच्या सत्तेचा मार्ग जातो असं बोललं जातं. नीतीश कुमार यांनी विरोधी इंडिया पक्षाची मोट बांधली आणि त्यापासून वेगळे झाले. त्यामुळे पुन्हा एकदा नीतीश कुमार सध्याची परिस्थिती पाहून पुन्हा भूमिका बदलतील असं बोललं जातं.
तेजस्वी यादव सातत्याने बिहारमधील निकाल धक्कादायक असतील असं बोलत होते. मात्र निकाल इंडिया आघाडीच्या मनासारखे नाहीत परंतु पूर्वीपेक्षा स्थिती चांगली आहे. निवडणुकीचा सातवा टप्पा झाल्यानंतर नीतीश कुमार यांच्याबाबत तेजस्वी यादव यांनी दावा केला होता. ४ जूनच्या निकालानंतर नीतीश कुमार मोठा खेळ खेळू शकतात असं सांगत तेजस्वी यादव यांनी नीतीश कुमारांना इंडिया आघाडीत येण्याची ऑफर दिली होती. ज्याप्रकारे निवडणूक निकाल समोर आलेत त्यामुळे भाजपाची अवस्था बिकट होताना दिसतेय. त्यात नीतीश कुमार वेगळी भूमिका घेणार का असा सवाल आता जोर धरू लागला आहे.
पलटी मारण्यात नीतीश कुमार माहीर
नीतीश कुमार भूमिका बदलण्यात माहीर मानले जातात. २०१३ मध्ये नरेंद्र मोदींना पंतप्रधानपदाचा चेहरा बनवल्यानंतर नीतीश कुमार यांनी एनडीए सोडली होती. त्यानंतर २०१७ मध्ये ते पुन्हा एनडीएसोबत गेले. त्यानंतर २०२२ मध्ये आरजेडी यांनी नीतीश कुमारांना साद घातली. मात्र १७ महिन्यानंतर पुन्हा नीतीश कुमारांनी भूमिका बदलून एनडीएला साथ दिली. नीतीश कुमारांचा राजकीय इतिहास पाहिला तर भाजपाची स्थिती पाहून त्याचा फायदा नीतीश कुमार घेऊ शकतात. त्यामुळे तसं झालं तर तेजस्वी यादव यांचं विधान खरे ठरेल.