नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आता देशात नवं सरकार बनण्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. तेलुगु देसम पार्टी(TDP) आणि भारतीय जनता पार्टी (BJP) यांच्यात सरकार बनवण्यासाठी सहमती बनली आहे. त्यानुसार केंद्र सरकारमध्ये १ कॅबिनेट आणि २ केंद्रीय राज्यमंत्रिपदे टिडीपीला देण्याबाबत मान्यता मिळाली आहे. लवकरच टीडीपी प्रमुख चंद्राबाबू नायडू पुन्हा दिल्लीत पोहचत आहेत.
यंदाच्या लोकसभेत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. भाजपाला सर्वाधिक २४० जागा मिळाल्या आणि भाजपा नेतृत्वातील एनडीएकडे बहुमताचा आकडा आहे. त्यामुळे केंद्रात घटक पक्षांना सोबत घेऊनच भाजपाला सरकार चालवावं लागणार आहे. इंडिया आघाडीकडून एनडीएच्या घटकपक्षांना ऑफर देण्यात येत आहे. ज्यामुळे राजकीय हालचाली दिल्लीत सुरू आहेत. एनडीए सरकार बनवणार हे चित्र असलं तरी अद्याप सस्पेन्स कायम आहे.
दिल्लीत ५ जूनला पंतप्रधान निवासस्थानी एनडीएच्या घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत घटक पक्षांनी भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे पाठिंबा पत्र दिलं आहे. त्यासोबतच नरेंद्र मोदी यांची नेतेपदी सर्वसमंतीने निवड करण्यात आली आहे. त्यामुळे एनडीएचं सरकार बनणार अशी स्थिती आहे. परंतु मंत्रिमंडळावरून एनडीएच्या घटक पक्षांमध्ये काही पेच निर्माण होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
दरम्यान, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा, कॅबिनेट मंत्रिपदाशिवाय सिंचन योजनेसाठी आणि नव्या अमरावती राजधानीसाठी केंद्राकडून अधिकचा निधी हवा आहे. आम्हाला आमचा हक्क मिळेल आणि एनडीएतील मजबूत भागीदार आहोत असं विधान टीडीपी प्रवक्त्या ज्योत्सना तिरुनागरी यांनी केले आहे.
घटक पक्षांच्या मागणीत वाढ
लोकसभा निवडणूक निकालात गेल्या वेळीच्या तुलनेत भाजपाची पिछेहाट झाल्याचं पाहून एनडीएतील घटक पक्षांच्या मागणीत वाढ झाली आहे. प्रत्येक पक्ष अधिकची मंत्रिपदे मागत आहे. एनडीएला २९३ जागांसह बहुमत मिळालं आहे. त्यात भाजपाला २४० जागा, तेलुगु देसम पार्टीला १६ आणि जनता दल यूनाइटेडला १२ जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे जेडीयू आणि टीडीपी हे किंगमेकर बनले आहेत.