Lok sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला अवघे काही तास शिल्लक आहेत. उद्या, 4 जून रोजी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि सायंकाळपर्यंत देशाची सत्ता कुणाच्या हातात जाणार, हे स्पष्ट होईल. निवडणूक आयोगानेही मतमोजणीसाठी सर्व तयारी पूर्ण केली असून, प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दरम्यान, आता काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला असून, हेल्पलाइन क्रमांकही जारी केला आहे. मत मोजणीवेळी काही गडबड आढळल्यास त्या नंबरवर व्हिडिओ पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत. या संदर्भात एक मोठी कायदेशीर टीमही स्थापन करण्यात आली आहे.
कार्यकर्त्यांना लिहिलेल्या पत्रात काँग्रेसने म्हटले की, ही जनतेची निवडणूक आहे. गेल्या काही आठवड्यांत भाजप आणि त्यांच्या नेत्यांनी वारंवार आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, संविधान बदलण्याचा आणि भारतीय लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. भाजपच्या या भ्रष्ट वर्तनामुळेच आम्ही काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्याला मतमोजणीदरम्यान घराबाहेर पडण्याचे आवाहन करतआहोत.
दिल्लीत देखरेख केंद्र सुरू आम्ही प्रदेश प्रभारींना विनंती करतो की, त्यांनी काँग्रेस कार्यालयात पक्ष कार्यकर्त्यांसाठी आवश्यक ती सर्व व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी मतमोजणीत अडचण येत आहे, अशा ठिकाणी पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करावी. आम्ही दिल्लीत एक देखरेख केंद्र सुरू केले आहे, जे 24 तास पूर्णवेळ काम करेल. मतमोजणी केंद्रावर काही संशयास्पद घडत आहे, असे तुम्हाला वाटल्यास, ते तुमच्या फोनवर रेकॉर्ड करा आणि आमच्या हेल्पलाइन नंबरवर त्वरित पाठवा. अशा कोणत्याही घटनेवर आवश्यक कारवाई करण्यासाठी आम्ही एक मोठी कायदेशीर टीम तयार केली आहे. मतमोजणी केंद्र आणि लोकसभा मतदारसंघाचे नाव व्हिडिओसह पाठवा, असे आवाहन या पत्रातून करण्यात आले आहे.