राजमुंदरी(आंध्र प्रदेश)- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी(दि.6) आंध्र प्रदेशातील राजमुंद्री येथे एका सभेला संबोधित केले. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेस (YSR Congress party) पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. आंध्र प्रदेशातील जनतेने वायएसआर काँग्रेस पक्षाला पूर्णपणे नाकारले असल्याची टीका त्यांनी केली.
पीएम मोदी पुढे म्हणाले की, जनतेने वायएसआर काँग्रेसला पाच वर्षे दिली होती, पण त्यांनी ती अतिशय वाईटरित्या वाया घालवली. राज्य सरकारमुळेच आंध्र प्रदेश मागासलेपणाच्या जाळ्यात अडकला आहे. तिकडे झारखंडमध्ये ईडीने छापेमारीत काँग्रेस नेत्याच्या नोकराच्या घरातून नोटांचा ढिग जप्त केला. यापूर्वीही काँग्रेसच्या एका खासदाराच्या घरातून चलनी नोटांचा डोंगर सापडला होता. इतक्या नोटा होत्या की त्या मोजताना मशीनही बंद पडली. ज्यांच्याकडे नोटांचे डोंगर सापडतात, त्यांची काँग्रेसच्या पहिल्या घराण्याशी जवळीक असते. काँग्रेस नेत्यांनी निकालापूर्वीच पराभव स्वीकारला आहे, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
जग भारताबद्दल आशावादी... पीएम मोदी पुढे म्हणाले की, आज भारत 'रिफॉर्म, परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म' या अद्भुत मार्गावर चालत आहे आणि वेगाने विकसित होत आहे. त्यामुळेच आज संपूर्ण जग भारताबद्दल अतिशय आशावादी आहे.