छतरपूर: मध्य प्रदेशातल्या छतरपूरमध्ये आज मतदान सुरू आहे. यावेळी एका मतदारानं सर्वांचं लक्ष वेधलं. वडिलांचे अंत्यसंस्कार आटपून मतदान करण्यासाठी आलेल्या या व्यक्तीचं सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे. पांढरा पंचा नेसून, डोक्यावरचे केस काढून ही व्यक्ती मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्रावर पोहोचली. त्यांना पाहून मतदान केंद्रावरील कर्मचारी आणि मतदारांना आश्चर्याचा धक्का बसला.मध्य प्रदेशातल्या लोकसभेच्या 7 जागांवर आज मतदान सुरू आहे. यात तिकमगढ, दामोह, खजुराहो, सतना, रेवा, होशांगबाद, बेतुल या मतदारसंघांचा समावेश आहे. यातील खजुराहो मतदारसंघातल्या छतरपूरमधील मतदान केंद्रावर सकाळी एक व्यक्ती मतदानाला पोहोचली. पांढरा पंचा नेसून ही व्यक्ती मतदान करण्यासाठी रांगेत उभी होती. वडिलांचा अंत्यनिधी पार पाडून तातडीनं या व्यक्तीनं मतदानाचा हक्क बजावला. मतदान करण्यासाठी अनेकजण असंख्य कारणं देत असताना वडिलांच्या निधनानंतरही मतदानाचा हक्क बजावणाऱ्या या व्यक्तीचं सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे.
कौतुकास्पद! वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपून त्यांनी बजावला मतदानाचा हक्क
By ऑनलाइन लोकमत | Published: May 06, 2019 1:45 PM