इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:03 PM2024-05-15T22:03:00+5:302024-05-15T22:03:55+5:30
ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीपूर्वी विरोधकांच्या INDIA आघाडीतून बाहेर पडल्या तृणमूलच्या सुप्रीमो आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आता एक मोठी घोषणा केली आहे. "इंडिया आघाडीचे सरकार आल्यावर आम्ही बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार आहोत," असे ममता बॅनर्जींनी म्हटले. पण, त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की, त्यांच्या पक्षाचा बंगालच्या सीपीएम आणि काँग्रेसशी काहीही संबंध नाही.
हुगळी जिल्ह्यातील चुंचुरा येथे एका सभेला संबोधित करताना ममता म्हणाल्या, ''पश्चिम बंगालमधील सीपीएम-काँग्रेसशी आमचा काहीही संबंध नाही. पण, दिल्लीत इंडिया आघाडीचे सरकार सत्ते आल्यावर राज्याच्या विकासासाठी सरकारला बाहेरुन पाठिंबा द्यायला तयार आहे.'' ममता बॅनर्जींच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. याचे कारण म्हणजे, सुरुवातीला त्या इंडिया आघाडीच्या भाग होत्या, पण नंतर जागा वाटपावरुन झालेल्या वादानंतर त्यांनी यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
ममता बॅनर्जींचा अनेकदा केंद्राला पाठिंबा
ममता आणि त्यांचा पक्ष तृणमूल याआधी अनेकवेळा थेट केंद्र सरकारमध्ये सामील झालेला आहेत. 1998 मध्ये स्थापन झालेल्या 13 महिन्यांच्या अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये थेट सामील न होता, त्यांनी बाहेरुन पाठिंबा दिला होता. पण, नंतर ममता बॅनर्जींसह तृणमूल नेतेही वाजपेयी आणि मनमोहन सरकारमध्ये सामील झाले होते.