भाजप मंत्र्यांना का वाटते, काँग्रेस-आपची युती व्हायला हवी होती
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2019 01:10 PM2019-05-04T13:10:06+5:302019-05-04T13:10:54+5:30
आमच्यासाठी काँग्रेस-आपची युती झाली की नाही, हे महत्त्वाचे नाही. वैयक्तील मला असं वाटत की, काँग्रेस-आपची युती झाली असती आणि आम्ही त्यांचा पराभव केला असता तर भाजपला त्याचा अधिक लाभ झाला असता, असं हर्षवर्धन यांनी नमूद केले.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यातील युती भलेही फिसकटली, मात्र या युतीचा भारतीय जनता पक्षाला लाभच झाला असता, असं मत केंद्रीयमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी व्यक्त केले. डॉ. हर्षवर्धन भाजपकडून चांदणी चौक मतदार संघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
आमच्यासाठी काँग्रेस-आपची युती झाली की नाही, हे महत्त्वाचे नाही. वैयक्तील मला असं वाटत की, काँग्रेस-आपची युती झाली असती आणि आम्ही त्यांचा पराभव केला असता तर भाजपला त्याचा अधिक लाभ झाला असता. तसेच आम्ही पुढील विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन वाटचाल केली असती, असंही हर्षवर्धन यांनी नमूद केले.
दिल्लीतील सर्व सात लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचा विजय होईल. तसेच काँग्रेस आणि 'आप'पेक्षा भाजप अधिक पुढे राहिल. भाजपचा विचार करता, काँग्रेस आणि आप सोबत आले असते, तर त्याचा सर्वाधिक आनंद मलाच झाला असता. असो. काहीही झालं तरी भाजपच विजय होणार असल्याचा विश्वास हर्षवर्धन यांनी व्यक्त केला.
गेल्या अनेक दिवसांपासून आप आणि काँग्रेस यांच्यात युतीच्या चर्चा सुरू होत्या. मात्र ही युती होऊ शकली नाही. काँग्रेसने आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर आपने देखील आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.