नवी दिल्ली - भारतीय जनता पक्ष सोडण्याचा आपला निर्णय जेंव्हा ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना समजला, त्यावेळी त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते, अशी माहिती भाजपमधून काँग्रेसमध्ये सामील झालेले शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
नवीन इनिंगची सुरुवात करण्याचा निर्णय घेतल्यानंतर सर्वप्रथम मी अडवाणी यांचे आशिर्वाद घेतले. त्यांनी मला पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी ते भावूक झाले होते. त्यांच्या डोळ्यात आश्रू आले होते. परंतु, त्यांनी मला रोखले नाही. ठिक आहे, आपला स्नेह कायम राहिल असंही अडवाणींनी म्हटल्याचे सिन्हा यांनी सांगितले.
दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा काळ आणि आजची स्थितीत यात मोठा फरक आहे. त्यावेळी देशात लोकशाही होती, परंतु आज हुकूमशाही निर्माण झाल्याची टीका सिन्हा यांनी केली. तसेच भाजपमधील वरिष्ठ नेत्यांना योग्य वागणूक मिळत नाही. अडवणी भाजपच्या संस्थापकांपैकी एक आहेत. मात्र भाजपने त्यांनाच तिकीट नाकरले. पक्षाने गांधीनगर येथून पक्षाध्यक्ष अमित शाह यांनी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.
२०१९ लोकसभा निवडणुकीत बालाकोट एअर स्ट्राईकमुळे निवडणुकीच्या निकालावर परिणाम होईल का, या संदर्भात सिन्हा यांना विचारण्यात आले. त्यावर सिन्हा म्हणाले, देशातील प्रत्येक व्यक्ती देशभक्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर बेरोजगारीचा मुद्दा काढल्यास ते पुलवामाची आठवण करून देतात. जनतेच्या मुख्य प्रश्नांकडे मोदी दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे २३ मे नंतर ते पंतप्रधान राहणार नाहीत. ममता बॅनर्जी यांनी मोदींनी 'एक्सपायरी पीएम' म्हटले आहे. ही उपाधी त्यांच्यासाठी योग्यच आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर त्यांना आपली झोळी उचलून निघावे लागणार, अशी टीकाही सिन्हा यांनी केली.