नवी दिल्ली - माझ्यावर वैयक्तिक टीका करणे, पप्पू म्हणून चिडवणे हे सगळे भाजपाचा माझ्यावरील क्रोध, राग आणि निराशादायी भावनेतून होत असते. पण त्यांच्या रागाला मी रागानेच उत्तर द्यावं यावर माझा विश्वास नाही. रागाने राग काढू शकत नाही, मी पंतप्रधानांचा आभारी आहे. त्यांनी मला खूप काही शिकवले आहे. विशेषकरून सहनशीलता. तुम्हाला कोणी शिकविणारा असेल तर तुम्ही त्याचा तिरस्कार कसा करू शकता? पंतप्रधान माझा द्वेष करु शकतात, पण माझ्या हृदयात केवळ त्याच्याबद्दल प्रेम आहे कारण मला माहिती आहे की, मोदींचा माझ्यावरील क्रोध फक्त त्यांच्या स्वत:ची असुरक्षिततेची आणि भीतीची भावना असल्यामुळे आहे असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. द टेलिग्राफ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी अनेक प्रश्नांना उत्तरं दिली आहे.
राहुल गांधी यांनी या मुलाखतीत मोदींवर टीकेच लक्ष्य केलं आहे. या मुलाखतीत राहुल गांधी यांनी म्हटलं की, राजकारणात असलेल्या व्यक्तींनी जनतेस सशक्त करण्यासाठी स्वत:ची शक्ती वापरली पाहिजे. विशेषत समाजातील ज्या घटकांचे आवाज दाबले जात आहेत त्यांना सशक्त केले पाहिजे. भविष्यात काँग्रेसचं नेतृत्व करणाऱ्या युवा पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी नेहमीच आमच्या वरिष्ठ नेत्यांची मदत झाली आहे. राष्ट्रीय, राज्य आणि स्थानिक पातळीवर संघटना मजबूत करण्यासाठी सर्व नेते प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षात कुठेही वरिष्ठ आणि नवीन पिढीमध्ये संघर्ष नाही असा दावा राहुल गांधी यांनी केला.
आगामी लोकसभा निवडणूक ही सत्तेसाठी नाही तर देशाच्या रक्षणासाठी आहे. अर्थव्यवस्थेची दयनीय अवस्था, कृषी संकट आणि मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी सामना आणि महत्त्वाचं म्हणजे धर्मनिरपेक्षता, विविधता आणि बहुलवाद यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात आमची लढाई आहे. सुप्रीम कोर्ट, आरबीआय आणि सीबीआयसारख्या स्वायत्त संस्थांवर यांच्यावर एक प्रकारचा दबाव आहे. जे अधिकारी आरएसएसच्या नियमांचे उल्लंघन करतील किंवा त्यांच्या धोरणावर टीका करतील अशा अधिकाऱ्यांना काढून टाकले जाते. सीबीआय संचालकांना मध्यरात्री पदावरुन हटविण्यात आलं. न्यायालयीन प्रक्रिया आणि निर्णय कसे हाताळले जात आहेत याबद्दल चार न्यायाधीशांद्वारे आयोजित पत्रकार परिषद अवघ्या देशाने पाहिली आहे असं राहुल गांधी यांनी मुलाखतीत सांगितले.
संपूर्ण भारतामध्ये लोक मोदींबद्दल नाराज आणि क्रोधित आहेत. लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी राष्ट्रवाद, देशभक्ती सारख्या शब्दाचा प्रचारात वापर करत आहे. मात्र देशाचे लोक मुर्ख नाही त्यांना माहीत आहे की यांच्याकडून आपण फसवले जाणार आहोत अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
उत्तर प्रदेशातील आघाडीबाबत काय वाटतं राहुल गांधींना ?उत्तर प्रदेशात आम्ही आशावादी होतो. पण एसपी-बीएसपीला वाटले की त्यांनी एकटे जावे. मात्र जर एसपी-बीएसपी-काँग्रेसची आघाडी झाली असती भाजपासाठी ही आघाडी विनाशकारी ठरली असती असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला.