नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील सहारनपूरमध्ये महाआघाडीची पहिली सभा रविवारी झाली. यावेळी 25 वर्षांनंतर पहिल्यांदाच सपा-बसपा-रालोदचे एकत्र आले होते. या सभेदरम्यान बसपाच्या प्रमुख मायावती यांनी आपल्या भाषणात 'मुस्लीम' शब्दाचा वापर केल्यामुळे येथील जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश देत निवडणूक आयोगाने अहवाल मागितला आहे.
बसपाच्या प्रमुख मायावती यांनी कालच्या सभेत जातीय कार्ड चालवले. म्हणाल्या, ‘मुस्लिमांनो, काँग्रेस भाजपाला टक्कर देऊ शकत नाही, फक्त महाआघाडीच भाजपाचा पराभव करु शकते. मतविभाजन टाळून महाआघाडीला एकगठ्ठा मते द्यावीत.’ दरम्यान, मायावती यांच्या या विधानाविरोधात अनेक तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या. त्यानंतर जिल्हा प्रशासनाला चौकशीचे आदेश देण्यात आले असून अहवाल मागितला आहे, असे उत्तर प्रदेशचे मुख्य निवडणूक अधिकारी वेंकटेश्वर लू यांनी सांगितले.
याचबरोबर, कालच्या सभेत आता चौकीदाराला चौकीतून हटवण्याची वेळ आली आहे, असे म्हणत समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. निवडणुकीआधी हे चौकीदार झाले आहेत. आता एका-एका चौकीदाराची चौकी काढून घेण्याचे काम आम्ही निवडणुकीत करू, अशा शब्दांमध्ये अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर हल्लाबोल केला.
याशिवाय यंदाची निवडणूक इतिहास घडवू शकते. त्यामुळे आपल्याकडे इतिहास लिहिण्याची संधी आहे, असे अखिलेश यादव यांनी म्हटले. सध्या द्वेष पसरवणारे नेते आले आहेत. हे नेते तिरस्कार पसरवण्याशिवाय काहीच करत नाहीत, अशा शब्दांमध्ये अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगींना लक्ष्य केले.