नवी दिल्ली - पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने केलेला एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुकीसाठी प्रचाराचा महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. उत्तर प्रदेशमधील भाजपचे नेते संगीत सोम यांनी एअर स्ट्राइकवर भाष्य करताना हवाई दल अजून काही काळ बालकोटमध्ये थांबले असते तर लाहोरमध्ये तिरंगा फडकला असता असं वक्तव्य केले आहे.
उत्तर प्रदेश येथील शामली जिल्ह्यातील प्रचार रॅलीला संबोधित करताना संगीत सोम म्हणाले की, बालकोट परिसरात दहशतवादी तळांना टार्गेट करण्यासाठी आपले हवाई दल त्याठिकाणी पोहचलं. बालकोट भागापासून काही अंतरावरच लाहोर शहर आहे. लाहोर इतकं जवळ आहे की, अजून दोन मिनिटे आपलं हवाई दल त्याठिकाणी थांबले असतं तर लाहोरमध्ये तिरंगा फडकलेला दिसला असता.
संगीत सोम हे पश्चिम उत्तर प्रदेशमधील सरधाना या मतदारसंघाचे आमदार आहे. सोम आपल्या विधानांनी वारंवार चर्चेत असतात. संगीत सोम यांचे हे विधान आता सोशल मिडीयात व्हायरल होतं आहे. संगीत सोम यांचं नाव 2013 मध्ये मुजफ्फरनगर येथे झालेल्या दंगलीमध्ये आरोपपत्रात होतं. सोम यांच्यावर भडकाऊ भाषण केल्याचा आरोप लावण्यात आला होता.
26 फेब्रुवारी 2019 रोजी भारतीय हवाई दलाने बालकोट भागात केलेल्या एअर स्ट्राइकनंतर निवडणुकीचं वातावरण बदल्याचं चित्र पाहायला मिळालं. एअर स्ट्राइकसारख्या धाडसी निर्णयामुळे देशभरातून नरेंद्र मोदी सरकारचं कौतुक करण्यात येत होतं. भारतीय जनता पार्टीकडून एअर स्ट्राइकचा मुद्दा देशभक्तीचा करण्यात आला. नरेंद्र मोदी यांच्या भाषणात पाकिस्तानला जशास तसे उत्तर दिलं, घरात घुसून मारले, हा नवीन भारत आहे असा उल्लेख कायम करण्यात येतो. भाजपच्या मंत्र्यांच्या भाषणातही एअर स्ट्राइकचा मुद्दा मोठ्या प्रमाणात वापरण्यात येतो.
पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने पाकिस्तानच्या हद्दीत घुसून दहशतवादी तळांवर एअर सर्जिकल स्ट्राईक केला आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय हवाई दलाने 26 फेब्रुवारीला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले. या कारवाईने जैश-ए-मोहम्मदचं कंबरडं मोडलं. जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने केलेल्या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफच्या 40 जवानांना वीरमरण आले होते.