रायबरेली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच प्रमुख पक्ष तयारीला लागलेत. उत्तर प्रदेश येथून लोकसभेमध्ये सर्वाधिक खासदार निवडून येतात. मागील निवडणुकीत 80 खासदारांपैकी 70 हून अधिक भाजपाचे खासदार उत्तर प्रदेशातून निवडून आले होते. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतही उत्तर प्रदेशातून जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी सपा-बसपा, काँग्रेस आणि भाजपा प्रयत्न करत आहेत.
उत्तर प्रदेशातील या जागांमध्ये महत्त्वाची जागा ती म्हणजे काँग्रेसचा गड असलेली रायबरेली लोकसभा मतदारसंघ. या जागेवरुन माजी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी निवडून येत असतात. सोनिया गांधी यांचा मतदारसंघ असलेल्या रायबरेलीमधून भाजपा कोणाला उमेदवारी देणार हे अजून जाहीर केलं नाही मात्र भाजपाकडून काँग्रेसच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी अनेक नावं पुढे येत आहे. त्यामध्ये मागील भाजपा उमेदवार अजय अग्रवाल यांचे नाव आघाडीवर आहे.
रायबरेली लोकसभा मतदारसंघाशी गांधी-नेहरू घराण्याचे जुनं नातं आहे. स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोतीलाल नेहरू आणि 1921 मध्ये मुशींगंज येथील शेतकऱ्यांवर झालेल्या गोळीबारानंतर जवाहरलाल नेहरू याठिकाणी आले. आत्तापर्यंत तीन अपवाद वगळता रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला पराभूत करण्यात यश आलं नाही. 1977 मध्ये जनता पार्टीकडून राज नारायण, 1996 आणि 1998 मध्ये भाजपाचे अशोक कुमार सिंह यांनी रायबरेली मतदारसंघात काँग्रेसला पराभूत केलं होतं. मात्र त्यानंतर या मतदारसंघावर नेहरु-गांधी कुटुंबाचा वचक आहे. तीन अपवाद वगळता कायम हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. 2014 लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रायबरेली मतदारसंघात विजय मिळवला होता.
1967 ते 1977 या कालावधीत रायबरेलीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. अनेक मोठ्या कंपन्या, संस्था याठिकाणी आल्या. मात्र 1977 नंतर जनता पार्टीचे राजनारायण याठिकाणी खासदार झाले तेव्हापासून रायबरेलीच्या विकासाला खीळ बसली असं येथील स्थानिक लोकांचे म्हणणं आहे. रायबरेली मतदारसंघात 16 लाख 50 हजार 767 मतदार आहेत. यामध्ये 8 लाख 70 हजार 954 पुरुष मतदार आहेत तर 7 लाख 79 हजार 813 महिला मतदार आहेत.
काँग्रेसकडून आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पुन्हा एकदा सोनिया गांधी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपाकडून अजय अग्रवाल या ठिकाणी निवडणूक लढण्यात इच्छुक आहेत. अग्रवाल यांच्याशिवाय काँग्रेसचे बंडखोर दिनेश प्रताप सिंह भाजपाकडून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. अजय अग्रवाल, दिनेश प्रताप सिंह यांच्यासह अमर सिंह, कुमार विश्वास आणि मिनाक्षी लेखी यांच्या नावाचीही भाजपाकडून चर्चा आहे. मात्र अद्याप भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडून कोणताही निर्णय घेतला नाही.