चेन्नई - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सर्वच नेते व्यस्त आहे. निवडणुकीच्या रणांगणात बाजी कोण मारणार हे निकालानंतर स्पष्ट होईल. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. या दौऱ्या दरम्यान राहुल यांनी स्टेला मॅरीस कॉलेज फॉर वुमनच्या विद्यार्थिंनींशी संवाद साधला.
यावेळी एका विद्यार्थिनीने राहुल गांधी यांना प्रश्न विचारताना "सर" म्हणून सुरुवात केली यावर राहुल गांधी यांनी त्या विद्यार्थिनीला मध्येच थांबवून तुम्ही मला सर ऐवजी राहुल म्हणून बोला असं सांगितल्यानंतर संपूर्ण सभागृहात जोरदार हशा पिकला. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहून राहुल गांधी यांनाही हसू आले.
आझरा नावाच्या फायनान्समध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनी राहुल यांना प्रश्न विचारण्यासाठी उभी राहिली. त्यावेळी आझराने हाय सर म्हणून प्रश्नाला सुरुवात केली. यावर राहुल यांनी कॅन यू कॉल मी राहुल असं सांगताच ती मुलगी लाजली, त्यानंतर पुन्हा तिने प्रश्न विचारताच राहुल गांधी यांचा एकेरी उल्लेख केल्याने सभागृहात हास्यकल्लोळ झाला.
विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी सांगितले की, मेहुल चौकसी, नीरव मोदी, विजय माल्ल्या यांच्या एक समान गोष्ट आहे ती म्हणजे हे तिघंही देश सोडून पळून गेलेत. देशात आता विचारांची लढाई सुरु आहे. एक विचार जो देशाला एक ठेवतो, सर्व देशातील सर्व लोकांना एकत्र आणतो.
याचसोबत राहुल गांधी यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना प्रश्न विचारला की, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्यासमोर असं उभं राहून तुमच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात का ? तसेच यावेळी त्यांनी विविध विषयांवर विद्यार्थ्यांशी चर्चा केली.
तसेच यावेळी एका विद्यार्थिनीने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना कर्ज बुडवणाऱ्या उद्योपतींबाबत राहुल गांधी यांनी बोलायला सुरुवात केली. त्या दरम्यान राहुल गांधी म्हणाले की, आम्हाला तो पैसा आणायचा जो 15-17 उद्योगपतींकडे आहे. जसं की नरेंद्र...नरेंद्र नाही नीरव मोदी अशी चूक लक्षात येताच सभागृहासह राहुल गांधी यांच्याही चेहऱ्यावर हसू आले.