नवी दिल्ली - मेरठमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांना टीकेचे लक्ष्य केले. काँग्रेसच्या न्याय योजनेचीही मोदी यांच्याकडून खिल्ली उडविण्यात आली. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाचा काँग्रेसकडून खरपूस समाचार घेण्यात आला आहे. नरेंद्र मोदी ड्रामा किंग असून न्याय योजनेची खिल्ली म्हणजे गरिबांची खिल्ली पंतप्रधानांनी उडवल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्याय योजनेवर टीका करताना म्हणाले होते की, ज्यांना गरिबांचे बॅंकेत खाते खोलता आले नाही ते लोक गरिबांना पैसे काय देणार? ही टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांची खिल्ली उडवली असून त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत अशी मागणीही केली आहे. तसेच नोटबंदीच्या वेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टाळ्या वाजवत गरिबांची खिल्ली उडवली होती असंही सुरजेवाला यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांच्या आघाडीची तुलना दारुच्या व्यसनाशी केली होती. ही नशा जनतेला बिघडवून टाकेल अशी टीका केली होती यावरही सुरजेवाला यांनी टीका केली. लोकशाहीत राजकीय पक्षांमध्ये कितीही मतभेद असले तरी एका मर्यादेचे पालन करणे गरजेचे आहे. पंतप्रधान मोदींकडून नेहमी या मर्यादेचे उल्लंघन केले जाते. पंतप्रधानपदावर असणाऱ्या व्यक्तीने लोकशाहीमध्ये अशी टीका करणे त्या पदाला शोभा देत नाही. 2017 मध्ये भाजपाने उत्तर प्रदेशात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अनेक आश्वासने दिली ती पूर्ण केलीत का? असा सवाल सुरजेवाला यांनी केला.
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर उत्तर प्रदेशातील मेरठ येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचार अभियानाची सुरुवात केली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला. यावेळच्या निवडणुकीत एकीकडे चौकीदार आहे आणि दुसरीकडे डागदार नेत्यांची जमवाजमव आहे. पाच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडे आशीर्वाद मागितला होता. तुम्हीही मला भरभरून प्रेम दिले. आता गेल्या पाच वर्षांत मी जे काम केले त्याचा सर्व हिशेब तुम्हाला देईन, तसेच इतरांचा हिशेबही घेईन. दोन्ही कामे एकाच वेळी सुरू राहतील तेव्हाच योग्य हिशोब होईल. शेवटी मी चौकीदार आहे आणि चौकीदार अन्याय करणार नाही असं पंतप्रधान म्हणाले.