नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदार सुरु असताना दिल्लीत मात्र काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या आघाडीवरुन अद्यापही चित्र स्पष्ट होत नाही. आपशी आघाडी करण्यावरुन काँग्रेसमध्येच दोन गट पडले आहेत. आपशी आघाडी करावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसमधील गटाला विरोध करण्याचं काम विरोधी गट करत आहे. त्यामुळे आपबाबतच्या आघाडीवरुन काँग्रेसमध्ये दुफळी माजल्याचं समोर येतंय.
सोमवारी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिल्लीतील काँग्रेसच्या नेत्यांची बैठक घेतली. यामध्ये आपसोबत आघाडी करण्यावरुन पक्षातील नेत्यांची राहुल गांधी यांनी मते जाणून घेतली. दिल्ली काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष शिला दिक्षित यांनी आपसोबत आघाडी करण्याला विरोध केला तर माजी अध्यक्ष अजय माकन यांनी आपसोबत आघाडी करावी अशी इच्छा व्यक्त केली.
आपसोबत आघाडी करण्यासाठी दिल्लीतील काँग्रेस प्रभारी पीसी चाको, सहप्रभारी कुलजीत नागरा, माजी प्रदेशाध्यक्ष अजय माकन, अरविंदर सिंह, सुभाष चोपडा, ताजबर बाबर हे काँग्रेस नेते आपशी आघाडी करण्यास इच्छुक आहेत तसेच यांच्यासोबत दिल्लीतील 14 जिल्हाध्यक्षही आपबरोबर आघाडी व्हावी म्हणून या नेत्यांच्या पाठिशी आहेत.
तर दुसरीकडे काँग्रेस प्रदेश अध्यक्षा आणि माजी मुख्यमंत्री शिला दिक्षित, कार्यकारी अध्यक्ष हारुन युसुफ, राजेश लिलोठिया, देवेंद्र यादव, जे पी अग्रवाल, योगानंद शास्त्री या काँग्रेस नेत्यांनी आपसोबत आघाडी करण्याला विरोध केला आहे. दिल्लीतील या घडामोडींबर राहुल गांधी यांनी दोन्ही बाजूच्या गटाने पत्र पाठवून आपलं म्हणणं मांडलं आहे. यावर राहुल गांधी संध्याकाळपर्यंत निर्णय घेण्याची अपेक्षा आहे.
आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसने आघाडी करावी असं मत अनेकवेळा मांडले आहे मात्र काँग्रेसकडून कोणतीही भूमिका स्पष्ट नसल्याने आपने सहा उमेदवारांची घोषणाही केली आहे. आपसोबत आघाडी करणार नाही असं मागील काँग्रेस बैठकीत स्पष्ट झालं होतं त्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेस आणि भाजपात छुपी युती असून भाजपाविरोधी मतांमध्ये फूट पाडण्यासाठी काँग्रेस मदत करत आहे असा आरोप अरविंद केजरीवाल यांनी केला होता. मात्र काँग्रेस-आपमधील या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी दोन्ही पक्षांशी बातचीत केली यानंतर पुन्हा दिल्लीमध्ये काँग्रेस आणि आम आदमी पक्षाशी आघाडी होण्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे.