गुरुदासपूरमध्ये सनी देओलला रोखण्यासाठी काँग्रेसकडून 'बॉर्डर'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 11:25 AM2019-04-28T11:25:25+5:302019-04-28T11:25:32+5:30
पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लहर आली आहे. राष्ट्रवादाचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने गुरुदासपूरमधून अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर अभिनेता सनी देओल याला लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. मात्र सनी देओलला रोखण्यासाठी काँग्रेसने आवश्यक ती तयारी सुरू केली आहे. त्यामुळे या मतदार संघातील निवडणूक आणखीनच रंगतदार होणार अशी चिन्हे आहेत. विनोद खन्ना यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे सुनील जाखड विजयी झाले होते. काँग्रेसकडून पुन्हा एकदा जाखड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
पुलवामा हल्ल्यानंतर बालाकोटमध्ये करण्यात आलेल्या एअर स्ट्राईकनंतर देशात राष्ट्रवाद आणि देशभक्तीची लहर आली आहे. राष्ट्रवादाचा फायदा घेण्यासाठी भाजपकडून गुरुदासपूरमधून सनी देओल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. बॉर्डर आणि गदर चित्रपटातून सनी देओलची राष्ट्रवादी प्रतिमा तयारी झाली आहे.
'हा' मुद्दा उचलणार काँग्रेस
सनी देओलची राष्ट्रवादी प्रतिमा काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेसने उपाययोजना सुरू केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सनी देओल आयात उमेदवार असल्याची बॉर्डर आखण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. यामध्ये पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह देखील सक्रीय झाले आहे. दोन दिवसांपूर्वीच अमरिंदर सिंह यांनी सनी देओल केवळ फिल्मी फौजी असून आपण खरे फौजी होतो, असे म्हटले होते. तसेच हा निवडणुकीचा रणसंग्राम आहे. येथे चित्रपटातील प्रतिमा उपयोगी पडणार नाही, असा दावा अमरिंदर सिंह यांनी केला होता.
पंजाब काँग्रेसच्या प्रभारी आशा कुमारी यांनी म्हटले होते की, पंजाबमध्ये भाजप गोंधळले आहे. भाजपला लोकसभेसाठी राज्यात एकही उमेदवार मिळत नसून त्यांना बाहेरून उमेदवार आयात करावा लागला, असा टोला देखील कुमारी यांनी लगावला होता.