नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी लोकांनी जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग जनजागृती करत असतं. निवडणूक आयोगाच्या या उपक्रमाला सामाजिक संस्थांनी मदत करत लोकांना मतदान करण्यासाठी जागरुक करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
लोकसभा निवडणुकीत मतदान करा आणि जवळच्या पेट्रोल-डिझेल पंपावर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळवा अशी ऑफर ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून लोकांना देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त मतदान करा आणि पेट्रोल-डिझेल दरामधील सूट मिळवा असं आवाहन असोसिएशनकडून करण्यात आलं आहे.
मतदान केल्यानंतर पेट्रोल-डिझेल भरण्यासाठी आलेल्या प्रत्येक ग्राहकाला ही ऑफर मिळणार आहे. यामध्ये पेट्रोल, डिझेलवर प्रतिलीटर 50 पैसे सूट मिळणार अशी घोषणा ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनकडून करण्यात आली आहे.
"मतदान करुन आलेल्या मतदाराला पेट्रोल, डिझेल खरेदीवर प्रतिलीटर 50 पैशांची सूट मिळणार आहे. त्यासाठी मतदान केल्यानंतर बोटावरील शाई ग्राहकाला पेट्रोल पंपावर दाखवावी लागणार आहे", असं ऑल इंडिया पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजय बंसल यांनी सांगितलं. लोकशाहीच्या या उत्सवात जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आहे. मतदारांसाठी ही ऑफर मतदानाच्या दिवशी सकाळी 8 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत असणार आहे, अशी माहिती अजय बंसल यांनी दिली.
काही दिवसांपूर्वी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी तामिळनाडूमधील एका व्यक्तीने चक्क सोन्या-चांदीने मढवलेली EVM ची प्रतिकृती बनवली होती. या ईव्हीएमवर विविध राजकीय पक्षांची निवडणूक चिन्हे चितारलेली आहेत. ईव्हीएमची ही प्रतिकृती बनवण्यासाठी सोने आणि चांदी वापरण्यात आली होती.
मतदानाच्या जनजागृतीसाठी त्याने बनवली सोन्या-चांदीने मढवलेली EVM
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी देशात 7 टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिल रोजी तर शेवटचा टप्पा 19 मे रोजी पार पडणार आहे. निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार आहे.