मुंबई - लोकसभा निवडणुका लढविणाऱ्या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षातील उमेदवार वगळता अमान्यताप्राप्त नोंदणीकृत पक्ष आणि अपक्ष उमेदवारांसाठी वाटप करण्यात येणाऱ्या चिन्हांमध्ये यंदा दुपटीहून अधिक वाढ करण्यात आली आहे. 198 निवडणूक चिन्हे ‘मुक्त चिन्हे’ घोषित करण्यात आली असून त्यावर डिजिटल साधनांचा प्रभाव दिसून येतो.
राष्ट्रीय व राज्यस्तरीय पक्षांची चिन्हे राखीव आहेत. 2014 च्या निवडणुकांमध्ये 87 मुक्त चिन्हे होती. त्यापैकी काही चिन्हे वगळून आणि नव्याने समावेश करुन यावर्षी 198 मुक्त चिन्हे निवडण्याची संधी उमेदवारांना उपलब्ध करुन दिली आहेत. यामधून उमेदवारांना चिन्हाची मागणी करता येणार आहे. निवडणूक चिन्ह (आरक्षण आणि वाटप) आदेश, 1968 नुसार लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना विहीत पद्धतीने चिन्हांचे वाटप केले जाते.
दैनंदिन वापरातील वस्तू, व्यक्तिगत साधने, दळणवळणाची साधने, फळे, भाज्या, स्वयंपाकघरातील वस्तू, खेळ, कृषी क्षेत्र, बांधकाम क्षेत्र, अत्याधुनिक संगणक युगातील साधने आदी विविध क्षेत्रातील साधनांचा मुक्त चिन्हांमध्ये समावेश करुन आयोगाने सर्वसमावेशकता जपली आहे.
मुक्त चिन्हांमध्ये नव्या- जुन्याचा मिलाफजुन्या काळातील वाळूचे घड्याळ, दळणाचे जाते, उखळ, नरसाळे, धान्य पाखडण्याचे सूप, ग्रामोफोन, टाईपरायटर, डिझेल पंप ते आधुनिक काळातील लॅपटॉप, कॉम्प्युटरचा माऊस, सीसीटीव्ही कॅमेरा, पेनड्राईव्ह, रोबोट, हेडफोन अशा नव्या-जुन्याचा संगम या मुक्त चिन्हांमध्ये करण्यात आला आहे.
व्यक्तिगत वापराच्या वस्तूंना स्थानआपल्याला सकाळी उठल्यापर्यंत लागणाऱ्या टूथब्रश, टूथपेस्ट पासून ते रेझर, साबणदानी, चप्पल, बूट, मोजे, उशी आदी व्यक्तिगत वापराच्या वस्तूंनाही चिन्हांमध्ये स्थान मिळाले आहे.
हेल्मेटद्वारे सुरक्षेचा संदेशमुक्त चिन्हांमध्ये हेल्मेटचा समावेश करुन आयोगाने एक प्रकारे दुचाकी चालकाच्या जिवीताच्या रक्षणासाठी संदेशच दिला आहे.
शेती आणि शेतकऱ्याला मान देणारी चिन्हे
या चिन्हांमध्ये ऊस शेतकरी, नारळाची बाग, डिजेल पंप, ट्रॅक्टर चालविणारा शेतकरी, शेतीच्या मशागतीसाठीचे टीलर, विहीर अशा चिन्हांचा समावेश करुन असून एकप्रकारे शेतीचे महत्त्व लक्षात घेतले आहे.
स्वयंपाकघरच अवतरलेगॅस सिलेंडर, गॅस शेगडी, रेफ्रीजरेटर, मिक्सर, प्रेशर कुकर, हंडी, कढई, तळण्याची कढई , काचेचा ग्लास, ट्रे, कपबशी, चहाची गाळणी, उखळ आणि खलबत्ता, शिमला मिर्ची, फूलकोबी, हिरवी मिरची, भेंडी, आले, मटार, फळांची टोपली, सफरचंद, द्राक्षे, फणस, अननस, अक्रोड, बिस्कीट, ब्रेड, केक आदींच्या रुपात मुक्त चिन्हे ठरविताना आयोगाने स्वयंपाकघराला मान दिला आहे.
यासोबत रिक्षा, ट्रक, हेलिकॉप्टर, जहाज अशी रस्ते तसेच जलवाहतुकीची साधने, विटा, थापी, करवत, कडी, कुलपाची चावी असे बांधकाम साहित्य, बॅट, बुद्धीबळ पट, कॅरम बोर्ड, फूटबॉल, ल्युडो, स्टम्प, हॉकी स्टीक आणि बॉल, टेनिस रॅकेट आणि बॉल, क्रिकेट फलंदाज, फूटबॉल खेळाडू आदी खेळांची साधने आणि खेळाडू, मोत्यांचा हार, हिरा, अंगठी आदी मौल्यवान दागिने, हार्मोनियम, सितार, व्हायोलीन आदी संगीताची साधने यांच्यासोबतच अनेक विविध क्षेत्रातील चिन्हेही मुक्त चिन्हांमध्ये समाविष्ट आहेत.