नवी दिल्ली - पंजाबमधील गुरुदासपूरमधून तिकीट न मिळाल्यामुळे नाराज झालेल्या दिवंगत खासदार आणि अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी कविता यांना भाजपने आपल्याला वाऱ्यावर सोडल्याचे म्हटले आहे. तिकीट वितरणासंदर्भात पक्षाने निर्णय घेतला आहे. मात्र यामुळे आपल्याला त्रास झाल्याचे कविता यांनी सांगितले.
तरी देखील आपण भाजपसोबत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करणार आहोत. तिकीट न मिळाल्याने मी निराश झाले आहे. पक्षाला तिकीट वितरीत करण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र यासाठी एक पद्धत असते. परंतु, ज्या पद्धतीने भाजपकडून आपल्याला वाऱ्यावर सोडण्यात आले, त्यामुळे आपल्याला फार दु:ख झाल्याचे कविता खन्ना यांनी नमूद केले.
दरम्यान आपली नाराजी आपण कुठेही व्यक्त करणार नाहीत. हा पूर्णपणे माझा निर्णय असून यावर आपण वैयक्तीक टीका देखील करणार नसल्याचे कविता यांनी स्पष्ट केले. तसेच मी वैयक्तीक त्याग करून संपूर्ण शक्तीनिशी नरेंद्र मोदी यांचे समर्थन करणार असल्याचे कविता यांनी म्हटले. २०१४ मध्ये विनोद खन्ना भाजपच्या तिकीटावर गुरुदासपूरमधून निवडून आले होते. त्यांच्या निधनानंतर हा मतदार संघ रिक्त झाला होता.
२०१९ लोकसभा निवडणुकीत भाजपकडून अभिनेता सनी देओल यांना तिकीट देण्यात आले आहे. सनीने काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याआधी सनीचे वडील धर्मेंद्र देखील भाजपकडून खासदार म्हणून निवडून आले आहे. तर तर हेमा मालिनी मथुरेतून निवडणुकीच्या रिंगणात आहेत.