नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु आहे. मै भी चौकीदार या अभियानाचे भाजपाकडून जोरदार प्रचार सुरु आहे. काठगोदाम शताब्दी एक्सप्रेसमध्ये रेल्वे प्रवाशांना देण्यात येणाऱ्या चहाच्या कपवर देखील मै भी चौकीदार असं छापण्यात आले होते. मात्र रेल्वेतील एका प्रवाशाने ट्विटरवर चहाच्या कपाचा फोटो काढून रेल्वेत अशाप्रकारे भाजपाकडून होत असलेला प्रचार निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन आहे असा आरोप करण्यात आला. ट्विटरवर हा फोटो शेअर केल्यानंतर तातडीने त्याची प्रतिक्रिया उमटली. रेल्वेकडूनही या प्रकरणाची माहिती मागविण्यात आली.
निवडणुकीची आचारसंहिता असताना चहाच्या कपवर होत असलेला प्रचाराची रेल्वे खात्याकडून दखल घेण्यात आली. रेल्वेला माहिती मिळताच तातडीने हे कप हटविण्यात आले. त्याचसोबत संबंधित ठेकेदार आणि ट्रेन निरिक्षकावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आलं. ट्विटरवर पायल मेहता या युजरने ही माहिती समोर आणली आहे. मात्र अशाप्रकारे चहाचे कप रेल्वेमध्ये दिले जात आहेत याची आम्हाला कल्पना नव्हती. आम्ही या प्रकरणाची चौकशी करु आणि फक्त एकाच ट्रेनमध्ये असे कप देण्यात येत आहेत की अजूनही ट्रेनमध्ये असे चहाचे कप वाटण्यात येत आहेत त्याबद्दल माहिती घेणार असल्याची माहिती रेल्वेने दिली.
काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मै भी चौकीदार या अभियानाची सुरुवात करण्यात आली होती. राहुल गांधी यांनी चौकीदार चोर है या अभियानाला उत्तर म्हणून भाजपाकडून मै भी चौकीदार अभियान छेडले होते. पंतप्रधानापासून भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी, नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी आपल्या नावापुढे चौकीदार शब्दाचा उल्लेख केला होता. तसेच व्हिडीओच्या माध्यमातून मै भी चौकीदारच्या जाहिराती भाजपाकडून प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या.
याआधीही निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता लागली असताना रेल्वे मंत्रालय, पेट्रॉलपंप, एअरपोर्ट याठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो काढण्यात आले नव्हते. यावरुनही निवडणूक आयोगाने संबंधित मंत्रालयाला फटकारले होते.