नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीसाठी अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपाकडून उमेदवारी अर्ज भरला. अर्ज दाखल केल्यानंतर जयाप्रदा यांनी उपस्थित जनसभेला संबोधित करताना सपा उमेदवारावर गंभीर आरोप करत भरसभेत भावूक झाल्या.
यावेळी जयाप्रदा म्हणाल्या की, मला रामपूर कधीच सोडून जाण्याची इच्छा नव्हती. रामपूरमध्ये गरिब लोकांवर दबाव टाकण्याचं काम केलं जातं. त्यासाठी मला रामपूर सोडायचं नव्हतं. सपाचे उमेदवार आजम खान यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी सांगितले की, जे कोणी त्यांच्याविरोधात जातात त्यांना जेलमध्ये टाकलं जातं. मी रामपूर सोडलं, सक्रीय राजकारणातून निघून गेले कारण माझ्यावर अॅसिड हल्ला करण्याचं षडयंत्र रचलं गेले. मला मारण्याचा प्रयत्न झाला असा आरोप जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाचे उमेदवार आजम खान यांच्यावर केला.
बुधवारी जयाप्रदा यांनी रामपूर लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज भरण्याआधी जयाप्रदा यांनी मंदिरात जाऊन पूजा केली. त्यानंतर झालेल्या सभेमध्ये त्यांनी आजम खान यांच्यावर हे गंभीर आरोप केले.
1994 साली जयाप्रदा यांनी एनटी रामाराव यांच्या तेलगुदेसम पार्टीमध्ये प्रवेश करत राजकारणात उतरल्या, आंध्र प्रदेश राज्यातून त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. उत्तर प्रदेशच्या राजकारणात येण्यासाठी जयाप्रदा यांनी समाजवादी पार्टीत प्रवेश केला. 2004 आणि 2009 ची लोकसभा निवडणूक जयाप्रदा यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर लढवली होती. 2011 मध्ये सपाचे माजी नेते अमर सिंह यांच्या राष्ट्रीय लोकमंच पक्षात जयाप्रदा यांनी प्रवेश केला. त्यानंतर 2014 मध्ये आरएलडीच्या तिकिटावर बिजनौर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. 2014 च्या निवडणुकीत जयाप्रदा यांचा पराभव झाला. काही दिवसांपूर्वीच जयाप्रदा यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत रामपूर लोकसभा मतदारसंघातून जयाप्रदा भाजपाकडून निवडणूक लढवत आहे तर त्यांच्याविरोधात समाजवादी पार्टीचे आजम खान हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.