नवी दिल्ली - लोकसभा निकालानंतर देशात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाल्यास भाजप व्यतिरिक्त तयार झालेल्या महायुतीला पाठिंबा देण्यासाठी आपण तयार असल्याचा इशारा तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी दिला आहे. मात्र त्यासाठी केसीआर यांनी उपपंतप्रधानपदाची अट घातली असून त्यासाठी हालचाल सुरू केली आहे.
भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आपण विरोधकांसोबत संपूर्ण सक्रीय सहभाग देण्यास तयार आहोत. मात्र यासाठी आपली एक अट असून विरोधाकांनी आपल्याला उपपंतप्रधान म्हणून प्रोजेक्ट करावे, असंही केसीआर यांनी सांगितले.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उपपंतप्रधान पदासाठी केसीआर विरोधकांमध्ये सक्रीय झाले आहे. २१ मे रोजी दिल्लीत विरोधकांची बैठक होणार असून त्या बैठकीला देखील केसीआर उपस्थित राहणार आहेत. केसीआर यांची मागणी काँग्रेस नेत्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहे. तर काँग्रेसने केसीआर यांच्या फॉर्म्युल्यावर बोलण्यास नकार दिला आहे. या सर्व बाबींवर लोकसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच चर्चा करण्यात येईल, असंही काँग्रेसकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान काँग्रेसनेते केसीआर यांच्या संपर्कात आहेत. तर केसीआर यांनी देखील आपण भाजपसोबत जाणार नसल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. स्वत: राष्ट्रीय राजकारणात येऊन मुलाकडे तेलंगणाची कमान सोपविण्याचा केसीआर यांचा इरादा आहे. तर आंध्र प्रदेशातील वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगमोहन रेड्डी यांनी आपले पत्ते अद्याप उघड केलेले नाहीत.