पटना - बिहारमधील बैगुसराय मतदार संघातील सीपीआयचे उमेदवार कन्हैया कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. भारतीय टपाल विभाग सध्या घाट्यात असून त्यावरून कन्हैया कुमार यांनी मोदींवर टीका केली. मोदी दररोज २० तास काम करत असल्यानेच देश बर्बाद होत असल्याचं कन्हैया यांनी ट्विट केले.
कन्हैया कुमार यांनी ट्विटमध्ये म्हटले की, एअर इंडिया, बीएसएनएल, एचएएल यानंतर भारतीय टपाल विभागाची स्थिती बिकट झाली आहे. पोस्ट विभागाला १५ हजार कोटींचे नुकसान झाले आहे. देश उगाच बर्बाद होत नसून चौकीदार साहेब दिवसांत २०-२० तास काम करत आहेत. ते देखील एकही सुट्टी न घेता, असा टोला कन्हैया यांनी लगावला.
दरम्यान भारत सरकारच्या टपाल विभागाने घाट्याच्या बाबतीत बीएसएनएल आणि एअर इंडियाला देखील मागे सोडल्याचे वृत्त माध्यमांमध्ये येत आहे. २०१८-१९ मध्ये टपाल विभाग १५ हजार कोटींनी घाट्यात आला आहे. मागील तीन वर्षांत टपाल विभागाचा घाटा १५० टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे टपाल विभाग आता सर्वाधिक घाट्यात असलेला सरकारी विभाग ठरला आहे.
जेएनयू विद्यार्थी नेता कन्हैया कुमार सध्या बेगुसरायमधून निवडणुकीच्या रिंगणात उभे आहे. त्यांच्यासमोर भाजपच्या गिरीराज सिंह यांचे आव्हान आहे. तर महाआघाडीकडून राजदने तनवीर हसन यांना उमेदवारी दिली आहे.