कधीकाळी 'महाराजां'सोबत सेल्फीची होती इच्छा; लोकसभेला त्याच महाराजांना पाडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 03:36 PM2019-05-24T15:36:57+5:302019-05-24T15:38:09+5:30
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीन मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया गुणा मतदार संघातून एक लाख मतांनी पराभूत झाले. त्यांना पराभूत करणारे कृष्ण पाल यादव उर्फ केपी कधीकाळी काँग्रेसचे नेते होते.
भोपाळ - लोकसभा निवडणुकीतील ५४२ जागांचे निकाल आले असून यामध्ये भाजपप्रणीत एनडीएने शानदार विजय मिळवला. मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील २९ पैकी २८ जागांवर काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. केवळ एका जागेवर काँग्रेसला विजय मिळविण्यात यश आले.
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे निकटवर्तीन मानले जाणारे ज्योतिरादित्य सिंधिया गुणा मतदार संघातून एक लाख मतांनी पराभूत झाले. त्यांना पराभूत करणारे कृष्ण पाल यादव उर्फ केपी कधीकाळी काँग्रेसचे नेते होते. सिंधियांच्या विजयचा शिल्पकार देखील त्यांना म्हटले जात होते. मात्र पक्षाकडून दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.
एकेकाळी केपी हे ज्योतिरादित्य सिंधिया यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी लाईनमध्ये थांबत असत. भाजपने कृष्ण पाल यांना तिकीट दिल्यानंतर ही गोष्ट सिंधिया यांची पत्नी प्रियदर्शिनी यांनीच सांगितली होती. ४५ वर्षीय केपी डॉक्टर आहेत. त्यांचे वडील अशोकनगरमध्ये काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते.
केपी एकेकाळी ज्योतिरादित्य सिंधीया यांचे निकटवर्तीय मानले जात होते. त्यांनी सिंधीया यांच्या निवडणुकीची तयारी जवळून पाहिलेली आहे. मुंगावली विधानसभा मतदार संघातून तिकीटासाठी केपी प्रमुख दावेदार होते. मात्र ऐनवेळी त्यांचे तिकीट कापण्यात आले. त्यानंतर नाराज झालेल्या केपी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
ज्योतिरादित्य सिंधीया यांच्याविरुद्ध केपी यांना तिकीट देण्यात आले तेव्हा ज्योतिरादित्य सिंधिया सहज विजयी होतील असा दावा करण्यात आला होता. मात्र केपीने ज्योतिरादित्य सिंधीया यांना चांगलेच जेरीस आणले. त्याच कालावधीत प्रियदर्शिनी यांनी एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. यात त्यांनी म्हटले होते की, कधीकाळी महाराजांसोबत सेल्फीसाठी प्रयत्नशील असलेल्या व्यक्तीला भाजपने तिकीट दिले. मात्र त्याच केपीने सिंधिया यांचा गड पाडला.
गुणा मतदार संघ सिंधिया कुटुंबियांचा गड मानला जायचा. या मतदार संघातून ज्योतिरादित्य सिंधीया यांची आजी विजयाराजे सहा वेळा, वडील माधवराव चार आणि खुद्द ज्योतिरादित्य चारवेळा विजयी झाले होते.