नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीच्या एक्झिट पोलमध्ये केंद्रातील भाजपप्रणीत एनडीएला बहुमत दाखविण्यात आले आहे. असं असले तरी विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. केंद्रातील सत्तेसाठी सर्वांच्या हालचाली असताना मध्य प्रदेशात मात्र चित्र वेगळ असून येथे बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती किंगमेकर म्हणून समोर येत आहेत.
मध्य प्रदेशात विरोधात असलेल्या भाजपचे नेते गोपाल भार्गव यांनी राज्यपालांना पत्र पाठवून विधानसभेचे सत्र बोलविण्याची मागणी केली आहे. भारतीय जनता पक्षाला ज्या प्रमाणे देशात आणि राज्यात पाठिंबा मिळत आहे, त्यामुळे अनेक काँग्रेस आमदार भाजपमध्ये सामील होण्यास इच्छूक आहेत. भारतीय जनता पक्ष आमदार खरेदीसाठी प्रयत्न करणार नाही. परंतु, काँग्रेसचे आमदारच भाजपमध्ये येऊ इच्छितात. त्यामुळे सत्ताधारी काँग्रेसने विधानसभेत आपले बहुमत सिद्ध करावे, अशी मागणी भार्गव यांनी केली आहे.
२०१८ मध्ये झालेल्या २३० विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत काँग्रेसला ११४ जागा मिळाल्या होत्या. केवळ दोन जागा कमी पडल्यामुळे काँग्रेस बहुमतापासून दूर आहे. तर भाजपला १०९ जागा मिळाल्या होत्या. भाजपला सत्तेसाठी ७ जागांची आवश्यकता होती. या निवडणुकीत बसपाचे दोन, सपाचा एक आणि चार अपक्ष आमदार निवडून आले होते. सपा-बसपाने आधीच काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यानंतर अपक्ष आमदारांनी देखील काँग्रेसला पाठिंबा दिला होता. मात्र मध्य प्रदेशात अपक्षांच्या पाठिंब्या व्यतिरिक्त बसपाचा पाठिंबा काँग्रेससाठी महत्त्वाचा आहे.
दरम्यान भाजपकडे मध्य प्रदेशात सरकार स्थापनेसाठी दोन मार्ग आहेत. एक म्हणजे, बसपा-सपा यांच्यासह चार अपक्षांचा भाजपला पाठिंबा मिळवणे आणि दुसरा म्हणजे काँग्रेसच्या काही आमदारांना आपल्या सोबत घेऊन सत्तास्थापनेचा दावा करणे. अशा स्थितीत मायावती काँग्रेससाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. मायावती यांच्या दोन आमदारांच्या मदतीने काँग्रेसची सत्ता कायम राहणार आहे.
मायावतींचा नकार
लोकसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलनुसार भाजपला बहुमत दाखविण्यात आले आहे. या संदर्भात चर्चा करण्यासाठी युपीए अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बैठक बोलविली होती. त्या बैठकीला मायावती यांना आमंत्रीत करण्यात आले होते. मात्र मायावती यांनी बैठकीला उपस्थित राहण्यासंदर्भात काहीही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे काँग्रेससाठी लोकसभेसह मध्य प्रदेशातील पेच आणखीनच जटील होण्याची शक्यता आहे.