भाजपकडून 'आप'च्या आमदारांना प्रत्येकी १० कोटींची ऑफर ; सिसोदियांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2019 10:36 AM2019-05-02T10:36:00+5:302019-05-02T10:37:16+5:30
मनिष सिसोदिया म्हणाले की, आपच्या सात आमदारांना प्रत्येकी दहा कोटींची ऑफर देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आणखी काही आमिषं दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीत १२ मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान होणार आहे. याआधीच आम आदमी पक्षाकडून धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना आरोप केला की, भाजपने 'आप'चे सात आमदार खरेदी करण्याचा प्रयत्न लावला आहे. तसेच या आमदारांना मोठ्या रकमेची ऑफर दिल्याचे त्यांनी सांगितले.
मनिष सिसोदिया म्हणाले की, आपच्या सात आमदारांना प्रत्येकी दहा कोटींची ऑफर देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आणखी काही आमिषं दाखविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपला दिल्लीत पराभव डोळ्यासमोर दिसत आहे. त्यामुळे त्यांच्याकडून आमदार खरेदीसाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावा देखील सिसोदिया यांनी केला. तसेच भाजपने पराभवापासून वाचण्यासाठी असे प्रयत्न करू नये, असंही त्यांनी म्हटले.
दरम्यान आमदारांना दहा कोटींची ऑफर देण्यात आली आहे. याआधी देखील भाजपकडून असा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. परंतु, त्यांच्या या प्रयत्नांना जनता चोख प्रत्युत्तर देईल, असंही सिसोदिया यांनी सांगितले.
दिल्लीत येत्या १२ मे रोजी मतदान होणार आहे. दिल्लीत एकून सात लोकसभा मतदार संघ असून आम आदमी पक्ष, काँग्रेस आणि भाजप अशी लढत दिल्लीत रंगणार आहे. अनेक चर्चांनंतर काँग्रेस आणि आपची युती फिस्कटल्यानंतर दिल्लीत तिरंगी लढत होणार हे निश्चित झाले आहे.
…..........