नवी दिल्ली - काँग्रसने भारतीय जनता पार्टीच्या मै भी चौकीदार या सोशल मिडीयावर कॅम्पेनवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत सध्या देशभरात चौकीदाराची चोरी चर्चेचा विषय बनली आहे. मोदी बाबा आणि त्यांच्या 40 चोरांनी नावापुढे चौकीदार शब्दाचा वापर करुन देशाला लुटण्याचं काम करत आहेत अशी टीका केली.
सुरजेवाला यांनी सांगितले की, मोदींचा ब्रँड अयशस्वी ठरल्यानंतर आता मै भी चौकीदार असा नवं कॅम्पेन भाजपकडून सुरु करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांचे अपयश लपविण्यासाठी असा पद्धतीचा सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे. प्रत्येक वर्षाला मोदी स्वत:च्या घोषणा बदलून नवीन घोषणा आणत असतं. मात्र मोदींची फसवी आश्वासने आता लोकांना कळू लागली आहेत. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने मोदी घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी मै भी चौकीदार हा नारा समोर आणला आहे. गरिबांकडून पैसे काढायचे आणि श्रीमंतांना द्यायचे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ढोंगीपणा लोकांसमोर आलेला आहे.
तसेच पुरातन काळात दरोडा, अपहरण करणाऱ्या टोळ्या वेश बदलून लोकांना लुटत होते. मात्र सध्याच्या काळात मोदी बाबा आणि त्यांचे 40 चोर टोळी बनवून देशाला लुटत आहेत. 5 वर्षात चौकीदाराने शेतकऱ्यांचे पैसे लुटले, महिलांच्या सुरक्षेचे अधिकार लुटले, युवकांपासून त्यांच्या नोकऱ्या लुटल्या. वंचित घटकांचा अधिकार लुटला आणि छोट्या व्यापारांचा व्यवहार लुटला अशी टीका काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
पंतप्रधान मोदींनी रविवारी ट्विटरवर स्वत:च्या नावात बदल केला. त्यांनी नरेंद्र मोदी या नावापुढे चौकीदार शब्द लावला. यानंतर भाजपाच्या समर्थकांनी ट्विटर अकाऊंटवर 'मैं भी चौकीदार' लिहिण्यास सुरुवात केली. भाजपा अध्यक्ष अमित शहांसह मोदींच्या मंत्रिमंडळातील अनेक सहकाऱ्यांनी नावापुढे चौकीदार शब्द लिहिला. भाजपाच्या समर्थकांनीदेखील हा ट्रेंड फॉलो केला. मोदींनी त्यांच्या भाषणात स्वत:ला देश का चौकीदार म्हटलं होतं. त्यानंतर राफेल खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करत राहुल यांनी चौकीदार चोर है अशी घोषणा दिली. या घोषणेला प्रत्युत्तर म्हणून मोदींनी ट्विटरवर स्वत:च्या नावापुढे चौकीदार शब्द लावला.
आगामी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या मालिका सुरु आहेत. मात्र चौकीदार या शब्दाला निवडणूक प्रचारात महत्त्व प्राप्त झाल्याचं चित्र दिसून येत आहे.