रायबरेली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2004 चा इतिहास विसरु नये, अटल बिहारी वाजपेयीही अजिंक्य होते मात्र त्यावेळी आम्हीच जिंकलो होतो. 2004 मध्येही अनेक राजकीय विद्वान मंडळी दावा करत होती अटलबिहारी वाजपेयी पुन्हा निवडून येतील मात्र त्यांचा दावा खोटा ठरवत जनतेने पुन्हा काँग्रेसला निवडून दिलं होतं अशी आठवण करुन देत सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी उत्तर प्रदेशातील रायबरेली लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर माध्यमांशी बोलताना सोनिया गांधी यांनी हे भाष्य केलं. सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींना खुल्या चर्चेचं आव्हान देण्यात आलं. भारताच्या इतिहासात असे अनेक लोक आहेत ज्यांना असं वाटतं की, ते अजिंक्य आहेत त्यांना कोणीही हरवू शकत नाही मात्र या देशातील जनता त्यांच्यापेक्षा मोठी आहे. नरेंद्र मोदी यांनी मागील 5 वर्षात देशातील जनतेसाठी काहीच केलं नाही. त्यांनी फक्त अनिल अंबानी यांना राफेल कंत्राट कसं मिळालं? याचं उत्तर द्यावं असा प्रश्न राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला.
सोनिया गांधी यांनी आज निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याआधी रोड शो काढला तसेच पूजा हवनदेखील करण्यात आला. सोनिया गांधी याआधी 4 वेळा रायबरेली लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका गांधी, जावई रॉबर्ट वाड्रा व नातवंडेही रेहान आणि मिराया यावेळी त्यांच्यासोबत होती. रायबरेली हा मतदारंसघ गांधी कुटुंबासाठी गड मानला जातो. याआधी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कर्मभूमी म्हणून ओळख होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अमेठी आणि रायबरेली मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भाजपानेही रणनिती आखली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात विजय कोणाचा होईल हे देशातील जनताच ठरवू शकणार आहे.