नवी दिल्ली - पाकिस्तानविरोधात भारताने केलेल्या एअर स्ट्राइकचे श्रेय कोणी घेण्याची गरज नाही, दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकचा मुद्दा लोकसभा निवडणुकीशी जोडला जाऊ नये, इतकचं नाही तर राजकीय फायद्यासाठी याचं श्रेय घेण्याची गरज आहे असं मतं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.
एका वृत्तवाहिनीवर दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरी म्हणाले की, पंतप्रधान पदासाठी मी दावेदार नाही तसेच मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत पण नाही. नरेंद्र मोदी यांना मोठ्या प्रमाणात जनमत मिळत असून ते पुन्हा पंतप्रधान होतील मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा मोदी सरकारला प्रचंड जनाधार मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचसोबत पाकिस्तानच्या विरोधातील कारवाईला निवडणुकांशी जोडलं नाही पाहिजे किंवा प्रचारासाठी याचा मुद्दा म्हणून वापर करु नये. विरोधी पक्ष यावर शंका उपस्थित करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. पण मी त्यांना आवाहन करेल की या मुद्द्यावर राजकारण करु नका.
मात्र सत्ताधारी पक्षाकडूनच प्रचारात या मुद्द्याचा वापर केला जातोय या प्रश्नावर नितीन गडकरी यांनी उत्तर दिले की, सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आाहे. या मुद्द्यावर कोणीही राजकारण करु नये, भारतात जर कोणालाही शहीद जवानांच्या कुर्बानीवर प्रश्नचिन्ह आहे. जर कोणी पाकिस्तानची भाषा बोलत असेल तर ते देशहिताच्या विरोधात आहे. हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे. त्यामुळे देशात या मुद्द्यावर राजकारण होऊ नये असं मला वाटतं
निवडणूक निकालानंतर जर या सरकारला कोणत्या इतर राजकीय पक्षांशी मदत घ्यावी लागली तर पंतप्रधान पदासाठी तुमचं नाव पुढे केले जाऊ शकते या चर्चेवर नितीन गडकरी यांनी भाष्य केलं. त्यावर त्यांनी सांगितले की, जर भाजपाला बहुमत आलं नाही तरी मी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नाही. पंतप्रधान बनण्याची माझी कोणतीही इच्छा नाही अथवा आरएसएसकडूनही अशी कोणती योजना नाही. माझ्या वक्तव्याची मोडतोड करून मिडीयामध्ये दाखवलं जातं. मी कधीच मी पंतप्रधान पदाच्या दावेदार आहे किंवा पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहे असं कुठेही म्हटलं नाही. पण मी विशेषत: सांगतो की, 2014 लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या आमच्या सरकारला मोठ्या प्रमाणात जनाधार मिळेल आणि पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी होतील असा विश्वास नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.