नोटाबंदी हा भाजपाचा सर्वात मोठा घोटाळा, काँग्रेसने जारी केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 03:09 PM2019-03-26T15:09:18+5:302019-03-26T15:10:13+5:30
नोटाबंदीचा निर्णय भाजपाच्या फायद्यासाठी घेण्यात आला असून भाजपाचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे
नवी दिल्ली - दोन वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 500 आणि 1000 च्या नोटाबंदी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा नोटाबंदीचा निर्णय भाजपाच्या फायद्यासाठी घेण्यात आला असून भाजपाचा हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल, रणदीप सुरजेवाला, अहमद पटेल, गुलाब नबी आझाद, मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज पत्रकार परिषद घेत भाजपावर हा आरोप लावला आहे. विरोधी पक्षाकडून एक व्हिडीओ जारी करण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2016 नंतर भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जुन्या नोटा बदलण्याचे काम सुरु होतं. नोटाबंदीच्या निर्णयामागे अनेक चौकीदारांनी गरिबांच्या खिशातले पैसे चोरले असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला.
Delhi: Opposition releases purported video from https://t.co/1Eai2kfdKv alleging a BJP worker offered to convert demonetised currency into new notes at a commission of 40%, in Ahmedabad post demonetization. pic.twitter.com/CyLHrapnbY
— ANI (@ANI) March 26, 2019
कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, देशातील चौकीदार देशासोबत गद्दारी करत आहेत. सामान्य माणसांचा पैसा त्यांच्या खिशातून चोरत आहे असा आरोप करत एक व्हिडीओ प्रसिद्ध केला त्यामध्ये पत्रकारांनी मिळून नोटाबंदीवर विशेष शोध मोहीम केली असल्याचा दावा करण्यात आला आहे. नोटाबंदीमुळे देशाचा आर्थिक विकास दर घटला. शेतकऱ्यांना नुकसान झाले. छोट्या व्यापाऱ्यांवर संकट आले. व्हिडीओमध्ये दाखविण्यात आले आहे की, 500 रुपयांच्या नोटा असलेले 5 करोडच्या बदल्यात 2000 रुपयांच्या नवीन नोटा असलेले 3 करोड रुपये देण्यात येत होते. हे सगळं 31 डिसेंबर 2016 नंतर करण्यात आलं.
दरम्यान कपिल सिब्बल यांनी पत्रकार परिषदेच्या शेवटी जाताना सांगितले की, या व्हिडीओची पुष्टी आम्ही करत नाही, हा व्हिडीओ आम्ही काढला नसून हा व्हिडीओ त्यांना एका वेबसाईटवर मिळाला आहे. ज्यामध्ये अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. या व्हिडीओमध्ये जे दाखविण्यात आलं आहे त्याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेस पक्षाने केली आहे.
8 नोव्हेंबर 2016 रोजी केंद्र सरकारकडून 500 आणि 1000 च्या जुना नोटा बंद करण्यात आल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री 8 च्या दरम्यान या निर्णयाची घोषणा केली होती. यानंतर अनेकांनी नोटाबंदीच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. विरोधी पक्षांसह सत्ताधारी असलेल्या शिवसेनेही भाजपाला या मुद्द्यावरुन टार्गेट केले होते.