नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मतदारांना जागरुक करा, मतदान करण्यासाठी मतदारांना प्रोत्साहित करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह विविध क्षेत्रातील दिग्गजांना केलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. देशात निवडणुकीचे वारे वाहू लागलं आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीत मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्लॉग देखील लिहला आहे. त्याचसोबत टिविट्ररवरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, विरोधी पक्षांचे नेते, सर्व राज्यातील मुख्यमंत्री, क्रिडा क्षेत्रातील खेळाडू, उद्योग क्षेत्रातील मान्यवर, कलाकार, गायक यांना मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करा असं आवाहन केलं आहे.
देशाची लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना मतदान करण्यासाठी जागरुक करा, मोठ्या प्रमाणात मतदान व्हायला हवं यासाठी राहुल गांधी, ममता बॅनर्जी, शरद पवार, मायावती, अखिलेश यादव, तेजस्वी यादव यांना टॅग करुन आवाहन केलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांमध्ये चंद्राबाबू नायडू, एच डी कुमारस्वामी, नवीन पटनायक यांना टॅग करुन लोकशाही मजबूत करण्यासाठी लोकांना मतदानासाठी जागरुक करा, मतदानाची टक्केवारी वाढवा असं आवाहन केलं आहे.
नरेंद्र मोदी यांनी ब्लॉगमध्ये म्हटलंय की, मतदान करणे प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपलं एक मत देशाच्या विकासासाठी महत्तपूर्ण असते. मतदानाचा अधिकार वापरुन आपण देशाच्या विकासाचं स्वप्न साकारु शकतो. देशात असं वातावरण बनवलं गेलं पाहिजे की, मतदान करणे गर्व आणि अभिमानास्पद वाटलं पाहिजे. विशेषत: जे यंदाच्या निवडणुकीत पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्यांच्यासाठी निवडणूक आणि मतदान करणे हा लोकशाहीचा उत्सव बनला पाहिजे.
मतदान न करणाऱ्या व्यक्तीच्या मनात पश्चातापाची भावना निर्माण व्हायला हवी. देशात काही चुकीचं घडत असेल तर देशातील प्रत्येक व्यक्तीने स्वत:ला जबाबदार धरलं पाहिजे, जर मी मतदान केलं असतं तर माझ्या देशावर संकट आलं नसतं याच विचाराने मतदान करा. मतदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान प्रक्रियेत भाग घ्या, मतदार यादीत तुमचं नावं आहे की नाही याची पडताळणी करा. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत जर कोणी सुट्टीच्या दिवशी बाहेर जाण्याचं नियोजन करत असाल तर मतदान केल्यानंतर बाहेर जा. स्वत:ही मतदान करा आणि दुसऱ्यालाही मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करा असं आवाहन देशातील प्रत्येक नागरिकाला केलं आहे.