पीएमओ ऑफिस नव्हे तर प्रचार मंत्री ऑफिस - राहुल गांधींची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 02:20 PM2019-03-20T14:20:04+5:302019-03-20T14:22:09+5:30
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पीएमओ ऑफिस हे प्रचार मंत्री ऑफिस झाले आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे.
नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पीएमओ ऑफिस हे प्रचार मंत्री ऑफिस झाले आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. मणिपूर राज्यातील विद्यार्थ्यांची संवाद साधताना राहुल गांधी यांनी प्रामुख्याने भाजपा आणि नरेंद्र मोदी यांना टार्गेट केले आहे.
यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस सास्कृतिक साम्यवादावर विश्वास ठेवत नाही, देशाच्या प्रत्येक राज्याची संस्कृती वेगळी आहे. ज्याचा आदर आपण ठेवायला हवा. देशातील प्रत्येक नागरिकाला बोलण्याचा अधिकार दिला आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले विचार इतरांवर लादू पाहतात, दुसऱ्यांचे विचार ऐकण्याची या लोकांची मानसिकता नाही. जेव्हाही यांच्याविरोधात कोणी आंदोलन करत असेल तर तेव्हा यांचा खरा चेहरा समोर येतो अशी टीका त्यांनी केली.
देशात बेरोजगारीचे सावट आहे. या संकटाला तोंड देण्यासाठी विविध क्षेत्रातील उद्योगांना चालना देण्याची भूमिका आमचे सरकार आल्यास आम्ही करु. कमीत कमी खर्चामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी आम्ही काम करणार असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डीग्रीबाबत आरटीआयमधून माहिती मागवण्यात आली त्याचे उत्तरही आलं नाही. पंतप्रधान कोणत्या महाविद्यालयातून शिकले आहेत याची माहिती कोणालाच नाही अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
याआधीही अनेकदा राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींच्या कार्यपध्दतीवर कडाडून टीका केली आहे. मोदी हे २०१४ च्या निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देत सत्तेवर आले, पण आजपावेतो त्यांनी एकाही आश्वासनांची पूर्तता केली नाही. राफेल करारात मोठा घोटाळा केला. फ्रान्सच्या अध्यक्षांनीच राफेलच्या कराराचे वास्तव उघडे केले आहे. भारत सरकारची एचएएल कंपनी असताना अननुभवी अनिल अंबानीना राफेलचे कंत्राट दिलेच कसे? असा सवाल त्यांनी केला होता.