नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र पाठोपाठ आता उत्तर प्रदेशात देखील आपण मागास जातीचे असल्याचे सांगितले. त्यामुळे उत्तर प्रदेशातील राजकारण आता जातीच्या मुद्द्यांवर तापताना दिसत आहे. यात आता काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांनी जातीचा उल्लेख करणाऱ्या मोदींवर निशाना साधला आहे. पंतप्रधान मोदींची जात आपल्याला ठावूक नसून विरोधकांकडून त्यांच्या जातीचा आतापर्यंत उल्लेख झाला नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर मागास असल्यामुळेच आपल्याला नीच संबोधले जाते असं मोदींनी एका सभेत म्हटलं होतं.
भाजपच्या उमेदवारांकडून नरेंद्र मोदी यांच्या नावावर मत मागितले जाते. राष्ट्रवादावर मतं मागण्यात येत आहेत. मोदींमध्ये कोणता राष्ट्रवाद आहे, असा सवाल प्रियंका गांधी यांनी केला आहे. त्या सध्या अमेठीमध्ये राहुल यांचा प्रचार करत आहेत.
प्रियंका यांच्याआधी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांनी मोदी विनाकारण निवडणुकीत जात काढत आहेत. तेजस्वी आधीच म्हणाले होते की, स्वत:ला नकली ओबीसी म्हणवणारे मोदी स्वत:ला दलित संबोधतात, परंतु, ते जन्मजात उच्चवर्णीय आहेत, असही त्यांनी म्हटले.
दरम्यान मायावती यांनी म्हटले होते की, पंतप्रधान मोदी उच्चवर्णीय होते. मात्र गुजरातमध्ये सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी आपल्या जातीला मागास वर्गात समाविष्ट केले. मागास लोकांचा हक्क हिसकावण्यासाठी आणि राजकीय फायद्यासाठी मोदी मागास वर्गात सामील झाल्याचा आरोप मायावती यांनी केला. तसेच मुलायम सिंह यादव आणि अखिलेश यादव यांच्याप्रमाणे मोदी जन्मत: मागास नाहीत, असंही मायावती यांनी पत्रकार परिषदेते सांगितले.