नवी दिल्ली - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मंगळवारी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. संकटकाळी इटलीला जाणाऱ्या राहुल आणि प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत इटलीला जावूनच मत मागावी, अशी टीका योगींनी केली. सोनिया गांधी मुळच्या इटलीच्या असल्यामुळे योगी यांनी अशी पद्धतीने टीका केली.
देशावर जेंव्हा संकट आले की, राहुल गांधी इटलीला जावून बसतात. काँग्रेस अध्यक्ष आणि प्रियंका गांधी यांना देशाचं काही घेणं-देणं नाही. त्यामुळे त्यांनी इटलीला निघून जायला हवं. तसेच तिथं मत मागायला हवी, अशी टीका योगी यांनी केली. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यातील मतदानासाठी योगी यांनी सभांचा धडाका लावला आहे. १९ मे रोजी सातव्या टप्प्यातील मतदान होणार आहे.
यावेळी योगींनी राहुल यांच्यावर वैयक्तीक टीका केली. तसेच निवडणूक प्रचारात राहुल यांच्या मामांचा उल्लेख केला. ख्रिश्चियन मिशेल राहुलचे मामा नसून 'शकूनी मामा' आहेत. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदीत तेच दलाल होते, असा आरोपही योगी यांनी लावला. जे भगवान कृष्ण आणि रामाला मानत नाहीत त्यांना देशातील जनता मतदान करणार नाही, असंही योगींने म्हटले.
योगी यांनी यावेळी सपा प्रमुख अखिलेश यादव आणि बसपा प्रमुख मायावती यांच्यावर देखील टीका केली. आपण राज्यात कायदा आणि सुव्यवस्था स्थापन केली, त्यामुळेच अखिलेश आणि मायावती एक व्यासपीठावरून सभांना संबोधीत करत असल्याचे योगी यांनी सांगितले.