जयपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी सांगतात मी चौकीदार आहे मात्र ते कोणाचे चौकीदार आहेत हे जनतेला सांगत नाही. तुम्ही कधी शेतकऱ्यांच्या घराबाहेर चौकीदार बघितलाय का? बेरोजगार तरुणाच्या घराबाहेर कधी चौकीदार बघितलाय का? मात्र अनिल अंबानी यांच्या घरी अनेक चौकीदार आहेत, त्याठिकाणी चौकीदारांची रांग लागलेली असते. नरेंद्र मोदी यांनी तुम्हाला ते अनिल अंबानी आणि नीरव मोदी यांचे चौकीदार आहे असं सांगितलं नाही असा टोला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लगावला आहे. राहुल गांधी आज राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी भाजपावर लक्ष्य केले. आगामी निवडणूक ही दोन विचारांची लढाई आहे. एकीकडे देशात दुफळी माजवण्याचा विचार आहे तर दुसरीकडे बंधूभाव, प्रेम आणि लोकांना एकमेकांशी जोडण्याचा विचार आहे. मागील 5 वर्षापासून पंतप्रधान मोदी दोन भारत बनविण्याचा प्रयत्न करत आहे, एक खाजगी श्रीमंत लोकांचा तर दुसरा गरिब, शेतकरी आणि जवानांचे आहे. राहुल गांधी यावेळी म्हणाले की, भाजपाकडून अनेक आश्वासने दिली गेली, 15 लाख रुपये मिळाले नाही, 2 करोड नोकरी देण्याचं आश्वासनही पूर्ण नाही. शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही एवढचं काय तर जे तुम्ही बचत म्हणून साठवलेले पैसेही मोदी यांनी नोटाबंदी करुन तुमच्याकडून लुटले. ज्या लोकांना आम्ही गरिबीपासून मुक्त केले अशा लोकांना मोदी यांनी पाच वर्षात पुन्हा गरिब बनवले असा आरोप राहुल गांधी यांनी केला. काँग्रेसचे सरकार जर सत्तेत आले तर भारतातील २० टक्के गरीबांच्या बँक खात्यात प्रतीवर्षी ७२,००० रुपये जमा करेल. म्हणजेच काँग्रेस ५ वर्षात ३,६०,००० रुपये गरीबांच्या बँक खात्यात जमा करुन दाखवेल असा विश्वासही राहुल गांधी यांनी जनतेला दिला.
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांचा पहिला राजस्थान दौरा आहे. काही महिन्यांपूर्वी भाजपाच्या वसुंधरा राजे यांना मात देत काँग्रेसचं सरकार राजस्थानमध्ये आलं आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत राजस्थानमधून काँग्रेसचे जास्तीत जास्त खासदार निवडून येण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करत आहे. राजस्थानात एकूण 25 लोकसभा मतदारसंघ आहे.