करनाल - तुम्ही कधी मोदींचे भाषण ऐकलंय का? लोकांशी बोलताना भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी मित्रो असा उल्लेख करतात, ते तुम्हाला मित्रो म्हणून संबोधतात मात्र अनिल अंबानी, मेहूल चौकसी यांना ते भाई म्हणून बोलतात. कारण मित्रांकडून पैसे लुबाडायचे आणि भावांना द्यायचे हे मोदींचे काम आहे अशी टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. राहुल गांधी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ हरयाणा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यांतर्गत राहुल गांधी यांनी लोकांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. काँग्रेसने आणलेली न्याय योजना ही गरिबीवर सर्जिकल स्ट्राइक करेल. या योजनेमुळे गरिबी कमी होईल. मागील वेळी आम्ही 14 करोड गरिबांना गरिबीच्या विळख्यातून बाहेर काढले यावेळी 25 करोड लोकांना गरिबीतून बाहेर काढण्याचा आमचा मानस आहे असं राहुल गांधी यांनी सांगितले.
आम्ही लोकांना न्याय देण्याचा निर्णय घेतला आहे. इतरांसारखे 15 लाख रुपयांची खोटी आश्वासने दिली नाहीत. मी खोटं कधी बोलत नाही, कारण खोटं बोलण्याचं काम नरेंद्र मोदी करत असतात. आमचं सरकार केंद्रात आल्यानंतर देशातील 20 टक्के गरिबांना वर्षाला 72 हजार रुपये देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत अशी ग्वाही राहुल गांधी यांनी सभेत दिली.
या देशात प्रामाणिक उद्योजक देखील आहेत. ज्यांना देशासाठी काम करायचं आहे. मात्र अनिल अंबानी यांनी विमान बनविण्याचा कोणताही अनुभव नसतानाही राफेलचं कंत्राट त्यांना देण्यात आलं. मोदी यांनी अनेक आश्वासने दिली त्यातील एकही आश्वासन ते पूर्ण करु शकले नाहीत असा आरोप राहुल गांधी यांनी केला.