बुलंदशहर - लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे भाषणामध्ये काँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. देशात काँग्रेसचं सरकार असेपर्यंत नीरव मोदी, विजय माल्या, मेहुल चौकसी देशातून पळाले नाहीत. मात्र त्यांना जेव्हा माहीत पडलं काँग्रेस सत्तेतून गेलं आणि सतर्क चौकीदाराचं सरकार देशात आलं तेव्हा त्यांनी भारत सोडून विदेशात पलायन केलं असा आरोप सिंह यांनी केला.
बॅंकाचे कर्जबुडीत ठेऊन नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चौकसी हे देशातून पळून गेले आहेत. त्यावरुन काँग्रेसकडून भाजपाला लक्ष्य करण्यात येतंय त्याचा पलटवार करण्यासाठी राजनाथ सिंह यांनी काँग्रेसला टोला लगावला. उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे आयोजित केलेल्या जनसभेला राजनाथ सिंह संबोधित करत होते.
दरम्यान आज सकाळी एका खाजगी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील बँकांना चुना लावून पळालेल्या उद्योजकांवर भाष्य केलं. नरेंद्र मोदी म्हणाले की, नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चौकसी यांच्याविरोधात आम्ही पावलं उचलली म्हणूनच या तिघांवर परदेशात कारवाई झाली. काँग्रेस सरकारच्या काळातच त्यांनी देशाला लुटलं होतं. गेल्या 10 वर्षात त्यांनी हा पैसा जमवला. ज्यावेळी त्यांना माहीत पडलं की देशात आमचं सरकार येणार त्यावेळी त्यांनी देशातून पळ काढत परदेशात आसरा घेतला. मात्र तरीही आम्ही त्यांना सोडणार नाही. या देशातील जनतेला मी आश्वासन दिलं आहे की, तुमच्या खिशातला एक पैसाही मी भ्रष्टाचाऱ्यांच्या हाती लागू देणार नाही. सरकारच्या कारवाईनंतर नीरव मोदी, विजय माल्या आणि मेहुल चौकसी यांच्या संपत्तीवर जप्ती आणण्याचं काम सुरु आहे.
तसेच योगी आदित्यनाथन यांनी सुद्धा काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांना अमेठी येथून पराभव होईल या भितीनेच आता वायनाड येथून देखील ते निवडणूक लढवणार असल्याचे योगी यांनी म्हटले आहे. त्याचसोबत केरळ मधील मुस्लिस लीग सोबत गठबंधन केल्याने यावरसुद्धा प्रश्न उपस्थित केले गेले. तर मुस्लिम लीग देशाच्या विभाजनाचे मुख्य कारण बनली होती त्यांच्यासोबतच आता काँग्रेसने गठबंधन केले आहे.