नवी दिल्ली - आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला असताना राजकीय पक्षांकडून मतदारांसाठी वेगवेगळ्या घोषणांचा पाऊस पाडला जातोय. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरिबांसाठी 72 हजार रुपये देण्याची घोषणा केली यावरुन भाजपानेराहुल गांधी यांना टीकेचं लक्ष्य केलंय.
राहुल गांधी यांच्या अगोदर इंदिरा गांधी यांनी 1971 मध्ये गरिबी हटाओचा नारा दिला होता. मात्र काँग्रेसच्या इतक्या वर्षाच्या सत्तेत कधीच गरिबी हटली नाही. राजीव गांधी हे पंतप्रधान होते तेव्हा त्यांनी सांगितले होते. जर आम्ही केंद्रातून 1 रुपये पाठवला तर तो ग्रामीण भागापर्यंत पोहचेपर्यंत 15 पैसे होतो अशी आठवण भाजपाचे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांना करुन दिली.
भाजपाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी सांगितले की, भारतात काही जण खोटी स्वप्ने दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. मागील 55 वर्षाचा काँग्रेसचा इतिहास पाहिला तर काँग्रेस नेहमी गरिबांच्या विरोधात काम करते असचं आहे अशी टीका रवीशंकर प्रसाद यांनी केली आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोमवारी सकाळी पत्रकार परिषद घेत सत्तेत आल्यास प्रत्येक गरिबाला 72 हजार रुपये वर्षाला दिले जातील असं आश्वासन दिलं. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असलेल्या कुटुंबांना वर्षाकाठी 72 हजार रुपये देण्यात येतील. ही रक्कम थेट बँक खात्यात जमा केली जाईल. देशातील 5 कोटी कुटुंबांना, म्हणजेच जवळपास 25 कोटी लोकांना याचा फायदा होईल, असा दावा राहुल गांधींना केला. जगातील कोणत्याही देशात अशी योजना नाही, असा दावादेखील त्यांनी केला. 'काँग्रेसनं जगातील प्रख्यात अर्थतज्ज्ञांशी चर्चा करुन आम्ही ही योजना तयार केली आहे. काँग्रेस सत्तेवर आल्यास देशभरात टप्प्याटप्प्यात ही योजना लागू करण्यात येईल,' अशी माहिती त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
मात्र राहुल गांधी यांची ही घोषणा पोकळ असल्याची टीका भाजपाचे नेते रवीशंकर प्रसाद यांनी केली. एकंदरीत निवडणुकीच्या वातावरणात राजकीय पक्षांकडून विविध लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जाणार हे नक्की