नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी काँग्रेसकडून कर्जमाफीच्या बाबातीत जनतेला धोका दिल्याचा आरोप केला होता. प्रत्यक्षात शिवराज सिंह चौहान यांचे भाऊ आणि काका यांना देखील शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. या संदर्भातील सरकारी कागदपत्र देखील मिळाले आहेत.
काँग्रेसकडूनमध्य प्रदेशातील शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पाळले गेले नसल्याचे आरोप गेल्या अनेक दिवसांपासून माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान करत आहेत. मात्र येथील काँग्रेस सरकारने इतर शेतकऱ्यांसह शिवराज सिंह यांचा भाऊ रोहित सिंह आणि काका निरंजन सिंह यांचे देखील कर्ज माफ केले आहे. सरकारी कागपत्रांमध्ये याची सविस्तर माहिती आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसने केलेल्या कर्जमाफीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप होत आहेत. यावरून शिवराज सिंह काँग्रेसला धारेवर धरत आहेत. तर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दावा केला की, राज्यात २१.०६ शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला. तसेच आचारसंहिता समाप्त झाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांचे कर्ज माफ करू असंही त्यांनी म्हटले आहे.
यातच काँग्रेस नेत्यांनी शेतकरी कर्जमाफीचे अनेक दस्ताऐवज शिवराज सिंह यांच्या घरी पाठवून दिले आहेत. कमलनाथ म्हणाले की, सत्तेत आल्यानंतर काही वेळातच काँग्रेसने शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती. मात्र यावर शिवराज सिंह खोटं बोलत आहेत. तसेच शेतकऱ्याने घरावर किंवा वाहनावर घेतलेले कर्ज आम्ही माफ केले नसून शेतीसाठी घेतलेले दोन लाखांपर्यंतचे कर्ज माफ केल्याचे कमलनाथ यांनी स्पष्ट केले.