नवी दिल्ली - आपल्या वादग्रस्त विधानांवरुन कायम चर्चेत राहणारे स्वयंभू बाबा स्वामी ओम यांनी नवी दिल्ली लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं आहे. बिग बॉस कार्यक्रमात स्पर्धक म्हणून स्वामी ओम यांनी सहभाग घेतला होता. स्वामी ओम यांनी अरविंद केजरीवाल यांच्या हिंदू विरोधी धोरणांच्या विरोधात लढाई करणार असल्याचं स्पष्ट केलं. अनेक हिंदू संघटनांनी शनिवारी घेतलेल्या बैठकीत स्वामी ओम यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं समजतं.
स्वामी ओम हे वादग्रस्त व्यक्तिमत्व कायम विविध कारणांनी चर्चेत राहिलं आहे. एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात स्वामी ओम यांनी महिलेला मारहाण केली होती. त्याशिवाय स्वामी ओम बिग बॉस सारख्या रिएलिटी शोमध्ये विविध वक्तव्यामुळे गाजले होते.
स्वामी ओम यांची वादग्रस्त मालिका देशाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या नियुक्तीला स्वामी ओम यांनी विरोध केला होता. ही नियुक्ती बेकायदा असल्याचा दावा स्वामी ओम यांनी कोर्टात केला होता मात्र सवंग लोकप्रियतेसाठी केलेल्या याचिकेबद्दल सुप्रीम कोर्टाने त्यांना दहा लाखांचा दंड ठोठावला होता.
दिल्लीमध्ये एकदा नथुराम गोडसे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी एका महिलेने त्यांच्या उपस्थितीला विरोध करत जयंतीसारख्या पवित्र कार्यक्रमात अशा ढोंगी बाबांना बोलावल्यास त्यांना चप्पलेने मारायला हवे, असे म्हटलं होतं. यानंतर काही लोकांनी स्वामी ओम यांना मारहाण केली होती.
2008 मध्ये स्वामी ओम यांच्याविरोधात त्यांच्या भावानेच पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. कॉलनीतील सायकल चोरीचा आळ त्यांच्यावर लावण्यात आला होता.
अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी काही जण जंतरमंतर येथे जमले होते त्यावेळी कोणालाही पूर्वकल्पना न देता स्वामी ओम त्याठिकाणी दाखल झाले होते. त्यावेळी तेथे उपस्थित असणाऱ्या महिलांनी ओम स्वामी यांना बेदम मारहाण केली होती.
अशा वादग्रस्त व्यक्तिमत्वाने आगामी लोकसभा निवडणूक लढवली तर त्यांची भाषणे नक्कीच वादग्रस्त ठरतील अशी शक्यता वर्तवली जातेय.