नवी दिल्ली - बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल २३ मे रोजी लागणार असून निकालानंतर देशात राजकीय भूकंप होणार आहे. या राजकीय भूकंपानंतर नरेंद्र मोदी आणि नितीश कुमार यांचे पक्ष डायनासोरसारखे लूप्त होतील, असा टोला तेजस्वी यादव यांनी लागवला.
भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निकालापूर्वी हार मानली आहे. भाजपचे नेतेच म्हणतात, प्रादेशिक पक्षांशिवाय सरकार स्थापन होणार नाही. त्यामुळे निकालानंतर राजकीय उलथापाथ होणार असून भाजपसह नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हे दोन्ही पक्ष लूप्त होणार आहेत, अस तेजस्वी यादव म्हणाले. बिहारमधील राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापले असून तेजस्वी यादव सध्या मोदी आणि नितीश कुमार यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीत.
देशाला राहुल गांधी यांच्याप्रमाणे पंतप्रधान हवा आहे. जो गरीबांची काळजी घेऊ शकतो. पंतप्रधान मोदींच्या बोलण्यात आणि कृतीत मोठे अंतर आहे. ते अभिनेत्री प्रियंका चोपडाच्या घरी जावू शकतात. परंतु, गरीबाच्या घरी जाण्याचे टाळतात. तर राहुल गांधी गरीबां पाठिसी असल्याचे तेजस्वी यांनी सांगितले.
यावेळी तेजस्वी यादव यांनी काँग्रेसच्या घोषणापत्रातील 'न्याय' योजनेसाठी राहुल यांचे आभार मानले. या योजनेचा सर्वाधिक लाभ गरीबांना होणार असल्याचे ते म्हणाले. गरीबांच्या खात्यात पैसा येण्यास सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेत सुधारणा होईल, असही तेजस्वी म्हणाले. यावेळी त्यांनी नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली. राज्यात दारुबंदी करण्यात आली. मात्र यामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेचा बोजवारा झाला आहे. तसेच लोक अजुनही ब्लॅकमध्ये दारू विकून पैसा कमवत असल्याचे त्यांनी म्हटले.