नवी दिल्ली - लोकसभा मतदानाच्या तिसऱ्या टप्प्यात देशाच्या 13 राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशातील 117 मतदारसंघांत मतदान होत आहे. ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. 'देशभरात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत. काही ठिकाणी ईव्हीएममधून भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. हा प्रकार गंभीर असून निवडणूक प्रक्रियेवर खर्च केले जाणारे 50 हजार कोटी रुपये वाया गेले आहेत' असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी केला आहे.
उत्तर प्रदेशसह देशाच्या विविध भागांमध्ये मंगळवारी (23 एप्रिल) मतदान होत आहे. मात्र अनेक ठिकाणी मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर ईव्हीएममध्ये बिघाड झाल्यामुळे निशाणा साधला आहे. 'देशभरात ईव्हीएममध्ये बिघाड झाल्याच्या किंवा भाजपालाच मत जात असल्याच्या तक्रारी येत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार कर्मचाऱ्यांना पुरेसे प्रशिक्षण नसल्याने या तक्रारी समोर येत आहेत. जवळपास 350 हून अधिक ईव्हीएम बदलण्यात आले आहे. हा 50 हजार कोटी एवढ्या अवाढव्य खर्चाच्या निवडणुकीमध्ये केलेला गुन्हेगारी स्वरुपाचा निष्काळजीपणा आहे' असे ट्वीट अखिलेश यादव यांनी केली आहे.
भाजपाचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायम सिंह यादव, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती, शशी थरुर, जयाप्रदा, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह केंद्रीय मंत्री सदानंद गौडा, श्रीपाद नाईक, वरुण गांधी, संबित पात्रा, महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, अनंत गीते आदी बड्या नेत्यांचे भवितव्य आज, मंगळवारी ईव्हीएम यंत्रात बंद होणार आहे. भाजपाची फाइट बऱ्याच ठिकाणी काँग्रेसप्रणित आघाडीशी तर काही ठिकाणी माकप, तसेच प्रादेशिक पक्षांशी असेल.
मोदीजी चहावाले तर आम्ही पण दुधवाले : अखिलेश यादव
2014 मधील लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी स्वत:ला चहावाला संबोधले होते. त्यामुळे 2014 मधील लोकसभा निवडणूक बऱ्याच अंशी चहावाला पंतप्रधान होणार या चर्चेच्या आजुबाजूला फिरत होती. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली चहावाला ओळख मागे सोडून चौकीदार रुप धारण केले आहे. त्यावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी विरोधकांकडून चौकादार मुद्दावरून मोदींवर जोरदार टीका करण्यात आली होती. तसेच समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी मोदींना लक्ष्य केले होते. फरुखाबाद येथे आयोजित सभेत अखिलेश यांनी चहावाला पंतप्रधान याची फिरकी घेतली. मोदी चहावाले असतील तर आम्ही पण दुधावाले असल्याचे अखिलेश यांनी म्हटले होते. मतदारांना संबोधित करताना अखिलेश म्हणाले की, आधी मोदी चहावाला म्हणून जनतेसमोर आले होते. आता तेच मोदी चौकीदार म्हणून समोर आले आहेत. परंतु या चौकीदाराला धडा शिकवण्याची वेळ आल्याचे अखिलेश यांनी सांगितले होते.