Lok Sabha Election 2019 : 'राम मंदिर नाही तर मोदी पण नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 01:48 PM2019-05-07T13:48:35+5:302019-05-07T13:55:20+5:30
दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे.
भोपाळ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांच्याविरुद्ध भोपाळ लोकसभा मतदारसंघात साध्वी प्रज्ञा सिंह यांना उतरवून भाजपाने कट्टर हिंदुत्वाचे कार्ड खेळले आहे. दरम्यान भोपाळमधील निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येत आहे तसतसे येथील राजकीय वातावरण अधिकाधिक तापत चालले आहे. दिग्विजय सिंह यांनी भाजपा सरकारने मंत्रीपदाचा दर्जा दिलेल्या कॉम्प्युटर बाबांना सोबत घेऊन रणनीती आखली आहे.
दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ कॉम्पुटर बाबा यांनी हजारो साधूंना सोबत घेऊन प्रचार सुरू केला आहे. तसेच भोपाळमध्ये हठयोग आयोजित करण्यात आला आहे. कॉम्पुटर बाबा यांनी 'भाजपा सरकार गेली पाच वर्ष सत्तेत आहे. मात्र राम मंदिर उभारू शकले नाहीत. आता राम मंदिर नाही तर मोदी पण नाही' असं म्हटलं आहे. दिग्विजय सिंह यांनी कॉम्प्युटर बाबांसोबत पूजा आणि हवनमध्ये सहभाग घेतला. या पुजेसाठी हजारो साधू भोपाळमध्ये पोहचले आहेत.
Bhopal: Congress leader Digvijaya Singh performs 'pooja' in the presence of Computer Baba, at the venue where he is camping along with thousands of sadhus to undertake Hat Yog. pic.twitter.com/8LfhAedzaW
— ANI (@ANI) May 7, 2019
भोपाळमध्ये सहाव्या टप्प्यासाठी रविवारी (12 मे) रोजी मतदान होणार आहे. दिग्विजय सिंह यांच्या समर्थनार्थ भोपाळमध्ये एक मोठी रॅली काढण्यात येणार आहे. कॉम्प्युटर बाबांकडे या रॅलीची सर्व जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या रोड शोमध्ये जवळपास सात हजार साधू-संत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी असलेल्या प्रज्ञा सिंह यांना उमेदवारी देत भाजपाने भोपाळ मतदारसंघातील निवडणुकीत कथित हिंदू दहशतवादाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. दरम्यान, एकीकडे साध्वी प्रज्ञा सिंह यांच्यामागे भाजपा आणि हिंदुत्ववाद्यांची ताकद आहे. तर दिग्विजय सिंह यांनाही अनेक संत महंतांकडून समर्थन मिळत आहे.
MP:Computer Baba who was granted status of minister in BJP govt,camps in Bhopal along with thousands of sadhus to undertake Hat Yoga,also campaigns for Congress leader Digvijaya Singh,says,"BJP sarkaar 5 saal mein Ram Mandir bhi nahi bana paayi. Ab Ram Mandir nahi toh Modi nahi" pic.twitter.com/BvvgBU7HxC
— ANI (@ANI) May 7, 2019
दिग्विजय सिंह पराभूत झाले तर घेईन जिवंत समाधी, या संतांनी केली प्रतिज्ञा
पंचायती श्रीनिरंजनी आखाढा महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज यांनी दिग्विजय सिंह यांना पाठिंबा जाहीर केला आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना महाराज म्हणाले की, ''आज अनेकजण धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडत आहेत. येथे सनातन धर्मामध्ये फूट पाडली जात आहे. मात्र हिंदुत्वावरून राजकारण होता कामा नये. सनातन धर्मावरून राजकारण होता कामा नये. त्यामुळे देशातील संत दिग्विजय सिंह यांच्यासोबत आहेत.' दिग्विजय सिंह यांना पाठिंबा देताना महाराजांनी मोठी प्रतिज्ञाही केली. ''येत्या 5 मे रोजी कामाख्या मातेचा महायज्ञ करण्यात येणार आहे. या यज्ञात पाच क्विंटल मिरचीची आहुती देण्यात येईल. मात्र या यज्ञादरम्यान कुणालाही ठसका लागणार नाही. या यज्ञामुळे दिग्विजय सिंह यांचा विजय होईल. तसेच दुर्दैवाने असे झाले नाही तर मी महामंडलेश्वर श्री वैराग्यनंद गिरी महाराज त्याच ठिकाणी जिवंत समाधी घेईन, ही माझी प्रतिज्ञा आहे,''असेही महाराजांनी म्हटले आहे.