उर्मिला मातोंडकर दिल्लीत दाखल, थोड्याच वेळात काँग्रेस पक्षात प्रवेश करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 11:48 AM2019-03-27T11:48:05+5:302019-03-27T12:11:35+5:30
रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
मनोहर कुंभेजकर
नवी दिल्ली - रंगीला गर्ल अभिनेत्री उर्मिला मातोंडकर या आज काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातून त्यांना उमेदवारी मिळणार असून त्यांची लढत भाजपाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या बरोबर होणार असल्याचे संकेत सूत्रांनी दिले. आज राहुल गांधी त्यांच्या उमेदवारीची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम,मालाड पश्चिमचे काँग्रेसचे आमदार अस्लम शेख आणि मुंबई काँग्रेस सरचिटणीस भूषण पाटील हे आज सकाळी उर्मिला मातोंडकर समवेत दिल्लीला गेले आहे.
काँग्रेस पक्षश्रेठींनी अभिनेत्री शिल्पा शिंदे, अभिनेत्री आश्विनी जोशी, अभिनेता कृष्णा अभिषेक आणि मुंबई काँग्रेसच्या चार्टर्ड अकाउंट सेलचे अध्यक्ष शेखर वैष्णव या नावांना नकार दिला होता. तर निरुपम यांनी सुचवलेले माजी विरोधी पक्ष नेते प्रवीण छेडा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला होता.
2004 च्या लोकसभा निवडणुकीत अभिनेता गोविंदला काँग्रेसने उत्तर मुंबईतून तिकीट दिले होते, त्यांनी उत्तर प्रदेशचे विद्यमान राज्यपाल आणि माजी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांचा पराभव केला होता. उर्मिला मातोंडकर यांनी 2016 मध्ये मोहसिन अख्तर यांच्याशी विवाह केला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांनी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांचा 4 लाख 46 हजार मतांनी पराभव केला होता.